नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ उडवून देणारे बदल अखेर हाय कमांडने केले आहेत. विद्यमान कार्यकारिणीतल्या अनेक मोठ्या नावांना आणि मंत्रिपदावरच्या व्यक्तींना फाटा देत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. नाना पटोले यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदी चर्चेत होतंच. त्याप्रमाणे त्यांना राज्यातले मोठं पद देण्यात आलं आहे. पटोले यांनी अगोदरच विधानसभेच्या सभापतीपदाचा राजीनामा दिला आहे.
नाना पटोले यांच्या अध्यक्षपदाबरोबरच 6 नवे कार्यकारी अध्यक्ष पक्षाने राज्यात नेमले आहेत आणि 10 उपाध्यक्षपदाचे चेहरे दिले आहेत. विद्यमान कार्याथ्यक्ष यशोमती ठाकूर, विश्वजित कदम यांना हटवलं आहे. त्याऐवजी चंद्रकांत हांडोरे, प्रणिती शिंदे यांना संधी देण्यात आली आहे.
अशी आहे काँग्रेसची नवी प्रदेश कार्यकारिणी
प्रदेशाध्यक्ष - नाना पटोले
कार्यकारी अध्यक्ष
1. शिवाजीराव मोघे
2. बसवराज पाटील
3. मोहम्मद अरिफ नसीम खान
4. कुणाल रोहिदास पाटील
5. चंद्रकांत हांडोरे
6. प्रणिती सुशीलकुमार शिंदे
उपाध्यक्ष
1. शिरीष मधुकरराव चौधरी
2. रमेश बागवे
3. हुसेन दलवाई
4. मोहन जोशी
5. रणजित कांबळे
6. कैलास गोरंट्याल
7. बी. जी. नगराळे
8. शरद आहेर
9. एम. एम शेख
10. माणिक जगताप
नवीन विधानसभा अध्यक्ष कोण?
नाना पटोले यांच्या रिक्त जागेवर तीन काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची नावं चर्चेत आहेत. भोर विधानसभा आमदार संग्राम थोपटे यांचे नाव पुढे आले आहे. थोपटे हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे कडवे काँग्रेसचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मंत्री म्हणून सुद्धा काम केले होते. महाविकास आघाडीत मंत्रिपद न मिळाल्यामुळे संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड केली होती.
त्यामुळे संग्राम थोपटे यांना संधी देऊन पुणे जिल्ह्यात काँग्रेसला वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यांची जमेची बाजू जरी असली तरी राष्ट्रवादी त्यांच्या नावाला अनुकूल राहील का याविषयी वेगवेगळे तर्क आहेत. तर दुसरे नाव हे सुरेश वारपूडकर यांचे समोर आले आहे. सुरेश वारपूडकर हे पाथरी मतदारसंघामधून निवडून आले आहेत. 1998 मध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे. परभणीमधून 1998-99 मध्ये खासदार सुद्धा होते. अत्यंत मितभाषी आणि सर्वांशी चांगले राजकीय संबंध ही वारपूडकर यांची जमेची बाजू आहे.
अमीन पटेल हे मुंबईतील आमदार असून ही त्यांची तिसरी टर्म आहे. मुंबादेवी मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे. मुस्लिम चेहरा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायद्याचा असला तरी शिवसेना मात्र त्यास तयार होईल का याबाबत मात्र शंका व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Breaking News, Congress, Maharashtra politics, Nana Patole