गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळावी, नाना पाटेकरांचा सल्ला

गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळावी, नाना पाटेकरांचा सल्ला

शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी नाम फाऊंडेशननं शेतकरी आणि शेतकरी संपाबाबत आपली भूमिका मांडली आहे.

  • Share this:

07 जून : जगण्याच्या मूलभूत हक्कासाठी शेतकऱ्यांना संपावर जावं लागणं यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही, असं मत ज्येष्ठ अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं आहे. तर शेतकरी संपाचा फुटबाॅल करू नका, असं वक्तव्य अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी केलं आहे.

शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी नाम फाऊंडेशननं शेतकरी आणि शेतकरी संपाबाबत आपली भूमिका मांडली आहे. तसंच, संपाला पाठिंबा देत कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे. या सगळ्यामुळे सरकारवरचा दबाव वाढतो आहे यात काहीही शंका नाही.

स्वामीनाथन आयोग शक्य तितक्या लवकर लागू करण्यात यावा, तसंच ज्या शेतकऱ्यांना खरंच गरज आहे, त्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशी आग्रही भूमिका नाना पाटेकर यांनी घेतली आहे. जो शेतकरी गळफास घेऊ शकतो तो उद्या गळफास देऊही शकतो असंही मत नाना पाटेकर यांनी स्पष्टपणे मांडलं आहे. तसंच वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावं ज्यामुळे शेतकऱ्याला आधार वाटेल, अशी प्रतिक्रियाही नाना पाटेकर यांनी दिली आहे. कर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी आहे, शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव दिल्यास कर्जमाफी मागावीच लागणार नाही, असं स्पष्ट मतही नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं.

कर्जमाफी, हमी भाव आणि स्वामिनाथ आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी झाल्यास बळीराजाला मोठा दिलासा मिळेल, असं मत मकरंद अनासपुरे यांनी मांडलं आहे. शेतकरी संघटित होतोय, ही महत्वाची गोष्ट आहे. आम्ही कोणत्याही प्रसिद्धीसाठी हे करत नाही तर शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्याचं जगणं सुसह्य व्हावं ही एकमेव भावना आमच्या मनात आहे असं अनासपुरे यांनी म्हटलं आहे. फक्त राजकारणातल्याच नाही तर विविध क्षेत्रातल्या लोकांनी, प्रसिद्ध आणि सधन व्यक्तींनी एकत्र येऊन शेतकऱ्याला आधार दिला पाहिजे असंही अनासपुरे यांनी म्हटलं आहे.

First published: June 7, 2017, 4:21 PM IST

ताज्या बातम्या