सातारा, 01 डिसेंबर : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान सुरू आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले अपक्ष म्हणून उमेदवार आहे. पण, मतदानासाठी आल्यावर मतदान यादीतच नाव नसल्यामुळे अभिजीत बिचुकलेला चांगलाच धक्का बसला. यामागे भाजपचा हात आहे, असा आरोपच बिचुकलेनं केला.
अभिजीत बिचुकले आज सकाळी पदवीधर मतदार संघासाठी मतदान करण्यासाठी आला होता. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मतदान करण्यासाठी अभिजीत पोहोचला त्यावेळी धक्काच बसला. कारण मतदार यादीत त्याचे नावच नव्हते. बिचुकलेची पत्नी अलंकृता बिचुकले यांचे यादीत नाव होते आणि त्यांच्या नावाच्या खाली नारायण बिचुकले नावाच्या व्यक्तीचे नाव होते. आपल्या पत्नीचे नाव आहे आणि आपले नाव नाही हे पाहून बिचुकलेचा भडका उडाला. अभिजीत बिचुकले याने मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडे याबद्दल विचारणा केली. पण, नावाच नसल्यामुळे मतदान करता येणार नाही, हे समजल्यावर बिचुकलेचा पार चांगलाच चढला.
'मी आणि माझ्या पत्नीने एकाच दिवशी अर्ज भरला, तिचे नाव आले आहे पण माझे नावच आले नाही. मी काय मूर्ख आहे का? याद्या प्रकाशित करण्यामध्ये गोंधळ घालण्यात आला आहे. भाजपकडून या याद्यांमध्ये गोंधळ घालण्यात आला आहे. 100 लोकांना मेसेज सोडण्यात आले आहे. हा साताऱ्यावर अन्याय आहे', असा गंभीर आरोप अभिजीत बिचुकलेनं केला.
'महाराष्ट्राला माहिती आहे, मी निवडणुकीसाठी उभा आहे. माझं नाव पाचव्या क्रमांकावर आहे. पण मतदान करण्यासाठी आलो असता यादीत नावच नाही. राज्य निवडणूक आयोगाने भोंगळ कारभार केला आहे, उमेदवाराचेच नाव यादीत नसणे याला काय म्हणायचे?', असा आरोपच बिचुकलेनं केला.
तसंच, 'मतदानाच्या याद्या बोगस असल्याचा आरोप एका राजकीय नेत्याने केला होता, त्यामुळे निवडणुका मॅनेज केल्या जात आहे का? कुठला तरी पक्ष यामागे आहे का? मी जेव्हा अर्ज भरला होता तेव्हा याद्या नव्हत्या आणि दुसऱ्या दिवशी यादी समोर आली होती', असा आरोपही बिचुकलेनं केला.