मुंबई 22 मे : सध्या राज्यभरात तापमानात मोठी वाढ झाली आहे. या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच आता या उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील काही भागांमध्ये आजपासून पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबतचा अंदाज वर्तवला आहे.
पुढील तीन दिवसांत विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबतच विजांच्या कडकडाटासह जोरदार वारेही वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
उष्णतेपासून लवकरच दिलासा मिळणार! पुढील 5 दिवस या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, भंडारा आणि यवतमाळ या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्राशिवाय येत्या काही दिवसांमध्ये भारताच्या अनेक भागात हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागराच्या काही भागात नैऋत्य मोसमी पावसाने आगेकूच केल्याने येत्या तीन दिवसांत पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
मान्सूनचा मुहूर्त आला -
यावर्षी मान्सून केरळमध्ये दाखल व्हायला थोडा उशीर होणार आहे. मान्सून केरळमध्ये 1 जूनऐवजी आता 4 जूनपर्यंत दाखल होणार आहे. केरळमध्ये मान्सून उशिरा दाखल होत असल्यामुळे महाराष्ट्रालाही पावसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. महाराष्ट्रात जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सूनच्या पावसाला व्यवस्थित सुरुवात होऊ शकते असा अंदाज आहे. जूनमध्ये मान्सूनपूर्व पाऊस येईल असा अंदाज आहे. तर मुंबईत मान्सून 14 जूनपर्यंत येऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rain, Weather Update