नागपूर, 15 मार्च : होळीपासून राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा सुरू झाला आहे. परिणामी अनेक जिल्ह्यात शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अशातच आता भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा विदर्भाला अलर्ट दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार नागपूर विभागात उद्यापासून 19 मार्चपर्यंत वादळी वारे, गारपीट तसेच पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 16 व 17 मार्च रोजी नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली या तीन जिल्ह्यात अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. गारपीट व वादळी पावसामुळे मनुष्य व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.
नागपूर विभागातील सर्व जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभागातर्फे नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात गुरुवार, 16 मार्च व शुक्रवार, 17 मार्च रोजी अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. त्यासोबतच 16 ते 19 मार्चपर्यंत संपूर्ण विदर्भात वादळी वारे तसेच गारांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. भंडारा व गोंदिया जिल्हयात शुक्रवार 17 मार्च रोजी अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
वाचा - Ahmednagar News: छोट्या शेतकऱ्यांची कमाल, खडकाळ माळावर फुलवली शेती, पाहा Photos
गारांसह पडणाऱ्या वादळी पावसामुळे शेतीपिके आणि फळपिकांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शहरी व ग्रामीण भागात कच्ची तसेच टीनाच्या पत्र्याच्या घरांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सतर्क राहावे. याकाळात वीजपुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे. यासोबतच दुरध्वनी लाईन व पायाभूत सुविधांची हानी होऊ शकते, असे विभागाच्या पूर्वानुमानत म्हटले आहे. वित्त व जिवीतहानी टाळण्यासाठी महसूल प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. हवामान विभागातर्फे दिलेल्या अतिसतर्कतेच्या इशारानुसार नागरिकांनीही खबरदारी घ्यावी.
होळीच्या दिवशी धुळे, नंदुरबारमध्ये गारपीट
राज्यात सगळीकडे होळी साजरी होत असताना उत्तर महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात मात्र गारपीट झाली. याचा धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात प्रचंड गारपीट झाली आहे. पाच वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या या गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.