Home /News /maharashtra /

चंद्रपूर : वाढदिवसाच्या मेणबत्तीमुळे घरात झाला ब्लास्ट; 10 वर्षीय चिमुरड्याची भयंकर अवस्था

चंद्रपूर : वाढदिवसाच्या मेणबत्तीमुळे घरात झाला ब्लास्ट; 10 वर्षीय चिमुरड्याची भयंकर अवस्था

भिसी या छोट्या गावात राहणारे विनोद , वैशाली व दहा वर्षीय आरंभ हे त्रिकोणी डोंगरे कुटुंब. तिघेही गावातच आपल्या मित्राकडे असलेल्या एका वाढदिवसानिमित्त गेले होते.

    हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 31 जुलै : वाढदिवसाचा कार्यक्रम म्हणजे आप्तस्वकीय एकत्र येणे, केक कापणे, भेटवस्तूंची देवाण-घेवाण आणि सोबत असते स्पार्कल मेणबत्ती. मात्र, या झगमगत्या स्पार्कल मेणबत्तीमुळे स्फोट घडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या भिसी या छोट्या गावात हा मोठा अपघात घडला आहे. आरंभ डोंगरे हा दहा वर्षाचा मुलगा यात गंभीर जखमी झाला. काय आहे संपूर्ण प्रकरण - भिसी या छोट्या गावात राहणारे विनोद , वैशाली व दहा वर्षीय आरंभ हे त्रिकोणी डोंगरे कुटुंब. तिघेही गावातच आपल्या मित्राकडे असलेल्या एका वाढदिवसानिमित्त गेले होते. वाढदिवसाला सुरुवात झाल्यावर केक कापला जातो. भेटवस्तूंची देवाण-घेवाण होते. आणि सोबतीला स्पार्कल मेणबत्तीचा झगमगता प्रकाश दिपवून टाकतो. पुढे हास्यविनोदात जेवणं होतात. मुलं आसपास खेळत असताना आरंभ डोंगरे हा दहा वर्षाचा मुलगा स्पार्कल मेणबत्तीशी चाळा करत असतो. तेवढ्यात मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर आरंभचा उजवा गाल आणि जीभ फाटली आहे. त्याला रक्तबंबाळ अवस्थेत 50 किलोमीटर दूरवरच्या ब्रह्मपुरी या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या आस्था रुग्णालयात हलविण्यात आले. रक्तस्त्राव अधिक झाला असल्याने व वय कमी असल्याने प्लास्टिक सर्जन असलेले डॉ. श्रीकांत पेरका, डॉ. सुमित जयस्वाल आणि डॉ. पंकज लडके यांच्या अथक परिश्रमाने 5 तास शस्त्रक्रिया चालली. आणि आरंभला 150 टाके लावल्यानंतर गाल-जीभ जुळवले. आपल्या सर्वांच्या घरांमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमात स्पार्कल मेणबत्ती सर्रास वापरली जाते. मात्र, ती किती घातक आहे हे या प्रसंगाने पुढे आणले. या वाढदिवस कार्यक्रमात एकदा ही स्पार्कल मेणबत्ती पेटविली गेली. त्यातून स्पार्कल बाहेर पडले. आणि स्फोट तब्बल 4 तासांनी झाला. ही यातील धक्कादायक बाब आहे. जखमी झाल्यावर आरंभचे फाटलेले गाल व जिभेला पडलेल्या जखमा अशा अवस्थेत क्षण न क्षण महत्त्वाचा होता. योग्य वेळी उपचार मिळाल्याने आस्था रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आरंभचा उपचार शक्य केला. मात्र, अशा आनंदी प्रसंगात मुलांच्या हाती अशी स्फोटकसदृश्य वस्तू देताना सावधानता बाळगा, असे आवाहन डॉक्टरांनी केले. हेही वाचा - 10 वर्षांपूर्वीच पतीवर अंत्यसंस्कार, अचानक समोर आला; पत्नी हादरलीच एक स्पार्कल मेणबत्ती किती घातक-स्फोटक ठरू शकते, हे घटनेतून समोर आले आहे. उपचार वेळेत मिळाल्याने आरंभ थोडक्यात बचावला. मात्र, समस्त पालकवर्गाने या घटनेतून बोध घेण्याची गरज आहे, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Birthday celebration, Chandrapur

    पुढील बातम्या