नागपूर, 1 एप्रिल : काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संपर्क कार्यालयात धमकीचा फोन आला होता. दहा कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हा फोन जयेश पुजारी यांच्या नावाने आला होता. जयेश पुजारी याने कर्नाटकच्या कारागृहात असताना गडकरींच्या कार्यालयात धमकीचा फोन केला होता. यापूर्वी देखील एकदा नितीन गडकरी यांना त्याच्याच नावाने धमकीचा फोन आला होता. सध्या जयेश पुजारी उर्फ कांथा हा नागपूरच्या धंतोली पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
..म्हणून धमकीचा फोन
जयेश पुजारीला डॉन व्हायचं होतं म्हणून त्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. डॉन बनण्यासाठी आपन नितीन गडकरी यांना धमकी दिल्याचा खुलासा जयेश पुजारी याने नागपूर पोलिसांसमोर केला आहे. ‘प्रोडक्शन वॉरन्ट’वर जयेश पुजारीला नागपुरात आणण्यात आलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण ?
काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरी यांच्या संपर्क कार्यालयात एक धमकीचा फोन आला होता. गडकरी यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हा फोन जयेश पुजारीच्या नावाने आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने एका मुलीचा फोन नंबर देखील दिला होता. तिच्या खात्यावर पैसे जमा करावेत असं आरोपीनं म्हटलं होतं. या फोननंतर पोलिस सतर्क झाले. नागपूर पोलिसांनी या प्रकरणात कर्नाटकमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या जयेश पुजारी याला चौकशीसाठी नागपुरात आणले. त्याच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Nitin gadkari