नागपूर, 18 डिसेंबर : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला. हा व्हिडिओ महाविकासआघाडीच्या मोर्चाचा असल्याचं संजय राऊत म्हणाले, पण संजय राऊत यांचा हा व्हिडिओ महाविकासआघाडीच्या मोर्चाचा नसून मराठा मोर्चाचा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच संजय राऊत अधूनमधून असं करत असतात, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
शनिवारी महाविकासआघाडीने मुंबईमध्ये मोर्चा काढला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान होत असल्याचं सांगत महाविकासआघाडीचे नेते रस्त्यावर उतरले. महाविकासआघाडीच्या या मोर्चाचा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी नॅनो मोर्चा असा केला होता. फडणवीस यांच्या या टीकेला उत्तर देताना राऊतांनी मोर्चाचा एक व्हिडिओ शेअर केला. पण संजय राऊत यांनी शेअर केलेला व्हिडिओ 2017 सालचा मराठा मोर्चाचा आहे.
देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच! महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज. देवेंद्र जी..हे वागणे बरे नाही. जय महाराष्ट्र! pic.twitter.com/DReN1k20LS
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 18, 2022
महाविकासआघाडीवर घणाघात
देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेमध्ये महाविकासआघाडीवर घणाघात केला. 'महापुरुषांच्या अपमानाबाबत त्यांनी सांगितलं. छत्रपतींच्या वारसांकडून पुरावे मागतात त्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसतात. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना मंच देतात. यांना योग्य ते उत्तर आम्ही देऊ,' असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.
'सीमा प्रश्न जणू काय हे सरकार आल्यावरच सुरू झाला असं दाखवलं जातंय. 2016 साली 77 गावांना आम्ही पाणी पोहोचवलं, उर्वरित गावांना पाणी पुरवतोय. आवाज उठवणारे कोणत्या पक्षाचे आहे हे सर्व आमच्याकडे आलं आहे. इंटलिजन्सच्या प्लानमध्ये हे स्पष्ट दिसतंय. हे आम्ही सभागृहात मांडू. काही पक्षांचे पदाधिकारी बैठका घेऊन दुसऱ्या राज्यात जायचा प्रस्ताव ठेवतात. विरोधकांना गोंधळ घालायचा तो घालू द्या,' असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
'ज्यांनी एका आठवड्याचं अधिवेशन घेतलं नाही ते बोलतायत तीन आठवड्यांचे अधिवेशन का नाही घेतलं. सर्व विरोधी पक्षांचं स्वागत करतो. कारण 3 वर्षांनी त्यांनी यायची संधी मिळाली आहे. आमचं सरकार नसचतं तर परत कोरोना वर आला असता. उद्धवजींकरता सांगतो दोन माईक आणून ठेवले आहेत, पण आम्हाला एकच माईक पुरेसा आहे,' अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
उद्धव ठाकरेंच्या पक्षाला नागपूरच्या विधिमंडळात कार्यालय मिळणार का? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला, तेव्हा कोणत्या? नॅनो सेनाला का? असा टोला फडणवीसांनी लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis, Sanjay raut