नागपूर, 2 फेब्रुवारी : एखादी घटना किंवा अपघात काळ वेळ आणि पूर्वकल्पना देऊन होत नाही. मात्र, काही अपघाताची तीव्रता कमी करण्यासाठी आपण योग्य ती खबरदारी नक्कीच घेऊ शकतो. वर्षांला लाखोंच्या संख्येने रस्ते अपघातात होतात. त्यात अनेकांचा जीव देखील जातो. वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास नागरिकांनी करावा यासाठी नागपुरातील एक व्यक्ती गेल्या 17 वर्षांपासून रस्त्यावर रस्त्यावर जनजागृती करत आहे.
18 फेब्रुवारी 2004 च्या रोजच्या सारख्या एक संध्याकाळी आपले नियमित काम आठवून पेशाने मेडिकल रिप्रेझेंटिव्ह असलेले संजय कुमार गुप्ता घरी जात होते. अनवधानाने गाडीचे साईड स्टॅन्ड काढायला ते विसरले आणि त्यामुळे अपघात होऊन त्यांच्या डोक्याला व पायाला जबर मार बसला. 2 महिने कोमामध्ये व 1 महिना व्हेंटिलेटर असलेले संजय कुमार वाचतील की नाही यावर डॉक्टरांनी देखील हात टेकले होते. मात्र त्यांचा दैव बलवत्तर म्हणून ते यातून ते बाहेर निघाले मात्र आज मागे वळून बघितले तर या घटनेची आठवण त्यांना आजही थरकाप उडवते. आपल्यावर ओढवलेला प्रसंग इतर कोणावरही ओढाऊ नये म्हणून या घटनेपासून ते हातात बॅनर घेऊन नागपूरच्या रस्त्यावर जनजागृती करत आहेत.
17 वर्षांपासून जनजागृती
आपल्यावर जो प्रसंग ओढायला तो इतर कुणावरही ओढवू नये म्हणून संजय कुमार हे गेली सतरा वर्षांपासून नागपुरातील रस्त्यांवर दैनंदिन जीवनातल्या फावल्या वेळेत दररोज विविध संदेश असलेले बॅनर घेऊन लोकांमध्ये जनजागृती करत आहेत. ट्रॅफिक नियम पाळा, हेल्मेटचा वापर करा, मोबाईलचा वापर गाडी चालवताना टाळा, अशा आशयाचे बॅनरच्या माध्यमातून लोकांना जीवनाचे मोल समजावून सांगत आहेत.
राज्यातील अनेक शहरात कार्य
काही लोक मला वेडे समजतात तर काही लोक माझ्या कामाचा गौरव करतात. मात्र गेली सतरा वर्षांपासून मी हे कार्य अविरतपणे करत आलेलो आहे आणि पुढे देखील करत राहणार आहे. जीवन हे अमूल्य आहे आणि जीवनाचा पार्ट टू हा कधीही नसतो. गेल्या अनेक वर्षांपासून मी शाळा महाविद्यालयात जाऊन या विषयी लेक्चर देत असतो. नागपूर सह पुणे, मुंबई, अमरावती, भंडारा, अहमदनगर इत्यादींसारख्या शहरांमध्ये जाऊन देखील माझे हे कार्य सुरू असते.
महाविद्यालयातील मुलांना नियमांची माहिती
माझ्या कार्याची दखल दिलीप वळसे पाटील साहेब यांनी देखील घेतली आहे. त्यांनी दोन वर्ष मला नियमित बोलवून शहरातल्या अनेक महाविद्यालयात लेक्चर देण्यासाठी बोलावले होते. वाहन चालवताना योग्य ती खबरदारी नागरिकांनी घेतली पाहिजे, वाहतूक नियमांचा काटेकोर पालन केले पाहिजे, हेल्मेटचा वापर करायलाच हवा. असे छोट्या छोट्या गोष्टीतून देखील आपले प्राण वाचू शकेल. यासाठी मी लोकांमध्ये उभा राहून हे जनजागृती कार्य करत आहे, अशी माहिती संजय कुमार गुप्ता यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.