नागपूर, 29 डिसेंबर: उत्तर भारतातील पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे काल महाराष्ट्रातील विदर्भासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy rainfall in maharashtra) कोसळला आहे. महाराष्ट्रात अहमदनगर, वाशीम, बुलडाणा आणि अकोला या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसानं जोरदार (rain with hailstorm) हजेरी लावली आहे. विदर्भातील काही भागात झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अचानक झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकं भुईसपाट झाली आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे.
आजही राज्यात अवकाळी पावसाचा धोका कायम (Non seasonal rain in maharashtra) आहे. हवामान खात्याने आज भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत संबंधित जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटाह जोरदार वाऱ्याच्या साथीने मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत देखील ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. या जिल्ह्यांत देखील आज तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-राज्यात पुन्हा Lockdown चे संकेत; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलं मोठं वक्तव्य
तर उर्वरित महाराष्ट्रात मात्र सर्वत्र कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासांत महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांना अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. उद्यापासून राज्यात अवकाळी पावसाचा धोका बहुतांशी प्रमाणात कमी होणार आहे. पण विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता कायम आहे. हवामान विभागानं आधीच वर्तवलेल्या अंदाजानुसार, पश्चिम चक्रवात आणि द्रोणीय स्थितीमुळे काल मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार गारपीट आणि पाऊस झाला.
हेही वाचा-महाराष्ट्रात तिसरी लाट निश्चित?, Covid टास्क फोर्सनं घेतला मोठा निर्णय
दुसरीकडे, पुण्यात मात्र किमान तापमानाचा पारा घसरला आहे. गेल्या तीन चार दिवसांत किमान तापमानात वाढ नोंदल्यानंतर, पुण्यात पुन्हा एकदा तापमानाचा पारा एक अंकी नोंदला आहे. आज पुण्यातील शिरूर याठिकाणी 9.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर माळीण (10.6), राजगुरूनगर (11.2), हवेली (11.5), निमगीरी (12), शिवाजीनगर (12.4) आणि जुन्नर येथे 12.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weather forecast, महाराष्ट्र