मुंबई, 25 डिसेंबर: गेली काही दिवस उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कडाक्याच्या थंडीनं (Cold wave) जनजीवन विस्कळीत झालं होतं. अमरावती, नागपूर आणि वर्धा या तीन जिल्ह्यांत आलेल्या थंडीच्या लाटेनं संपूर्ण विदर्भ गारठलं होतं. जीवघेण्या कडाक्याच्या थंडीनंतर विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं सावट (Non seasonal rainfall alert) निर्माण झालं आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम आधीच वाया गेला असताना, रब्बी हंगामात अवकाळी पावसाचं सावट निर्माण झालं आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा वर्षाचा शेवट देखील वाईट होण्याची शक्यता आहे.
हवामाना खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उद्यापासून (26 डिसेंबर) वायव्य भारतात आणि 27 डिसेंबर पासून मध्य भारतात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने 28 आणि 29 डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
उद्या 26 डिसेंबरपासून वायव्य भारतावर व 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता. राज्यात खाली दर्शविल्या प्रमाणे 28-29 डिसेंबरला काही जिल्यांत गडगडाटासह पावसाची शक्यता व काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. -IMD Pl see IMD Updates. pic.twitter.com/Y3M0zBMY4c
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 25, 2021
मंगळवारी (28 डिसेंबर) जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या अकरा जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात मंगळवारी अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय नाशिक, धुळे, बीड आणि नांदेड या चार जिल्ह्यांत मंगळवारी अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत देखील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी कोसळणार आहेत.
हेही वाचा-BREAKING : औरंगाबादमध्ये Omicron चा शिरकाव, 2 प्रवासी पॉझिटिव्ह
बुधवारी (29 डिसेंबर) देखील महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. बुधवारी हवामान खात्याने नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकं वाहून जाण्याचा तसेच त्याच्यावर कीड पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weather forecast, महाराष्ट्र