नागपूर, 28 मे : हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठणवरुन मुंबईमध्ये (Mumbai) शिवसैनिक आणि राणा दाम्पत्य यांच्यात झालेली राडेबाजी सावरता सावरता मुंबई पोलिसांचे नाकीनऊ आले होते. मात्र या वेळेस नागपूर पोलीस राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हावी ठरले. नागपूर पोलिसांनी आज नागपूर शहराला राजकारणाचा आखाडा न होऊ देता सुनियोजित पद्धतीने संपूर्ण परिस्थिती हाताळली.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांचा हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सुंदर कांड पठणाचा कार्यक्रम एकाचवेळी आणि एकाच ठिकाणी आयोजित करण्यात आल्यामुळे आज नागपूरचे पश्चिमेश्वर हनुमान मंदिर राजकारणाचा आखाडा ठरेल, असं वाटत होतं. मात्र नागपूर पोलिसांनी जे चातुर्य दाखवलं त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि राणा दाम्पत्य आमनेसामने आले नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हनुमान चालीसा पठण आणि सुंदर कांड पठणासाठी 12 वाजताची वेळ देण्यात आली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी साडेबाराला आपला कार्यक्रम सुरू केला आणि बराच वेळ लांबवला. त्याच काळात राणा दाम्पत्य देखील विमानतळावर दाखल झाले होते. सुरुवातीला नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना पंधरा मिनिटं विमानतळाच्या व्हीआयपी कक्षामध्ये बसून ठेवलं. त्यानंतर राणा दाम्पत्य पोलिसांच्या विनंतीला न मानता विमानतळाच्या बाहेर निघाले.
('हा छत्रपती घराण्याचा अपमान नाही, संभाजीराजेंनी पक्ष स्थापन करणं अयोग्य', शाहू महाराजांनी कान टोचले)
समर्थकांचे स्वागत प्रसिद्धी माध्यमांशी संवाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण केल्यानंतर जेव्हा नवनीत राणा आणि रवी राणा हनुमान मंदिरासाठी मार्गस्थ व्हायला लागले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचं सुंदर कांड पठण सुरूच होतं. त्यामुळे नागपूर पोलिसांनी विमानतळाच्या एक्झिट रोडवर आपले एक वाहन आडवे करून राणा दाम्पत्यांचा ताफा पंधरा ते वीस मिनिटं अडवून ठेवला.
जेव्हा राणा दा्म्पत्य पश्चिम ईश्वर हनुमान मंदिरामध्ये पोहोचले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते निघून गेले होते. नागपूर पोलिसांनी चातुर्य दाखवल्याने आज नागपूर शहर हे राजकारणाचा आखाडा बनलं नाही. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. चांगल्या-चांगल्यावर हावी ठरणारे राणा दाम्पत्यावर मात्र आज नागपूर पोलीस आपल्या चातुर्याने हावी ठरल्याचे पाहायला मिळाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.