नागपूर, 9 डिसेंबर : विधान परिषदेची निवडणूक (MLC election) अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असताना नागपुरात (Nagpur) काँग्रेसच्या (Congress) गोटातील हालचालींना प्रचंड वेग आला आहे. मतदानासठी अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रेसने थेट उमेदवारच बदलला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेसने विधान परिषदेसाठी नागपूरमध्ये भाजपातून आलेले छोटू भोयर (Chhotu Bhoyar) यांना उमेदवारी दिल्याचं जाहीर केलं होतं. पण त्यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांचा विरोध होता. त्यामुळे अखेर मतदानाला अवघे काही तास उरले असताना काँग्रेसने उमेदवार बदलला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने याबाबत प्रसिद्ध पत्रक जारी करत माहिती दिली आहे. छोटू भोयर यांनी निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविल्याने अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना काँग्रेसकडून पाठिंबा देण्यात येणार आहे, असं त्या पत्रकात म्हटलं आहे.
राज्याचे ऊर्जा मंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. "ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. जमिनीवरच्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे. ही निवडणूक लढत असताना अनेक कंगोऱ्यांचा विचार करावा लागतो. काँग्रेस पक्षाने यावेळी नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्तपणे संपूर्ण ताकदीने लढण्याचा संकल्प केला आहे. तुम्हाला उद्या मतदान संपेल तेव्हा निवडणूक अत्यंत रोमांचक आणि स्पर्धात्मक झालीय, असं दिसेल. काँग्रेस पक्षाचा विजय हा सुनिच्छित झाला आहे. त्या दिशेने आम्ही वाटचाल केली आहे. पत्रात जे लिहिलंय त्याविषयी मी भाष्य करु शकत नाही. ते प्रांताध्यक्षांचं आहे. एक कार्यकर्ते म्हणून त्यांचं पालन करणं आमचं काम आहे", असं नितीन राऊत म्हणाले.
हेही वाचा : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 247 कोटींचे हेरॉईन जप्त, आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई
"मी 17 दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षात सहभागी झालो होतो. त्यावेळी काँग्रेस पक्षाने छोटू भोयर भाजपचा पराभव करेल असं वाटत होतं. पण आता 9 डिसेंबरला छोटू भोयर भाजपचा पराभव करु शकत नाही, असं काँग्रेसला वाटत असेल. त्यामुळे काँग्रेस पक्षाने माझ्या उमेदवारीचा निर्णय मागे घेतला असेल तर त्या निर्णयाचं मी स्वागत करतो. मी त्या निर्णयाचं समर्थन करतो. मी या निर्णयाला असमर्थता दर्शवलेला नाही. काँग्रेस पक्षाचा जो आदेश आहे त्या आदेशाचं मी तंतोतंत पालन करेन. मी फक्त विधान परिषदेचं तिकीट लढण्यासाठी काँग्रेसमध्ये आलेलो नाही. काँग्रेस पक्षाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात मी जाणार नाही. या 12 तासाच्या आत माझ्याकडून जे शक्य आहे ते सर्व मते मंगेश देशमुख यांच्याकडे वळवेल. काँग्रेस पक्षात विश्वासाचं वातावरण निर्माण करावं लागेल. अविश्वासामुळेच आम्ही भाजपमध्ये आलोय", अशी प्रतिक्रिया छोटू भोयर यांनी दिली.
हेही वाचा : मुंबईसाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी, जिनोम सिक्वेन्सिंगमधून महत्त्वपूर्ण माहिती उघड
राज्यात विधान परिषदेच्या सहा जागांसाठी 10 डिसेंबरला मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली होती. या सहा जागांपैकी काही ठिकाणी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पण नागपुरातील जी विधान परिषदेची जागा आहे त्या जागेवर चांगलीच लढत बघायला मिळणार आहे. काँग्रेसकडून छोटू भोयर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर दुसरीकडे मंगेश देशमुख यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. देशमुख यांना काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा पाठींबा होता. त्यामुळे आंतर्गत राजकीय घडामोडींमुळे अखेर छोटू भोयर यांना माघार घ्यावी लागली. तर दुसरीकडे भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या मैदानात चंद्रशेखर बावनकुळे आणि मंगेश देशमुख यांच्यात लढत होणार आहे. या लढतचा निकाल 14 डिसेंबरला जाहीर होतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Nagpur News, काँग्रेस