नागपूर, 10 डिसेंबर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी (Nagpur MLC Election) आज मतदान होत आहे. काँग्रेसने (Congress) शेवटच्या क्षणाला आपले अधिकृत उमेदवार रवींद्र भोयर (Ravindra Bhoyar) यांना बाजूला करून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना समर्थन दिलं आहे. त्यामुळे या निवडणुकीला एक नवा ट्विस्ट आला आहे. तर भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीमध्ये एकूण मतदारांची संख्या 559 आहे. यामध्ये महानगरपालिका 155, जिल्हा परिषद 70, नगरपरिषद आणि नगरपंचायत 334 अशी मतदार संख्या आहे.
नागपूर शहरातील तीन मतदान केंद्र आणि ग्रामीण भागातील 12 अशा एकूण 15 केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 8 ते 4 असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मतदारांसाठी दोनच ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत. एक म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाने निर्गमित केलेले मतदार छायाचित्र ओळखपत्र किंवा मतदार ज्या स्थानिक प्राधिकारी संस्थेचा सदस्य असेल त्या स्थानिक प्राधिकारी संस्थेने निर्गमित केलेले ओळखपत्र अनिवार्य आहे. याशिवाय अन्य कोणताही पुरावा ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरलं जाणार नाही.
मतदान करताना मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. १,२,३ किंवा 1,2,3 किंवा I,॥, III अशा आकड्यांमध्ये आपला पसंती क्रमांक दर्शविणे आवश्यक आहे. शब्दांमध्ये पसंती क्रमांक नोंदविता येणार नाही. मतदान केंद्रांमध्ये मोबाईल, स्पाय कॅमेरा, स्पाय पेन, कॅमेरा, टॅब, तसेच कोणतेही इलेक्ट्रॉनिक साधन घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. एकूण 15 मतदान पथके यासाठी कार्य करणार आहेत.
हेही वाचा : नागपुरात काँग्रेसच्या गोटात कमालीच्या घडामोडी, मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना थेट उमेदवार बदलला
या निवडणुकीमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रत्येक मतदान केंद्रासाठी करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर थर्मल स्कॅनिंग केले जाणार आहे. स्कॅनरमध्ये शरीराचे तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त आढळल्यास अशा मतदारांना शेवटच्या एका तासामध्ये मतदान करता येणार आहे. सर्व केंद्रावर सॅनिटायझर थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.