मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नागपूरमध्ये भाजपला तिसरा धक्का, बालेकिल्ल्याचा बुरूज का ढासळतोय?

नागपूरमध्ये भाजपला तिसरा धक्का, बालेकिल्ल्याचा बुरूज का ढासळतोय?

gadkari fadanavis modi

gadkari fadanavis modi

महाराष्ट्रातल्या या पाच शिक्षक-पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपला फक्त एकाच जागेवर यश मिळालं आहे. उरलेल्या तीन जागा महाविकासआघाडीला आणि एक जागा अपक्षाला मिळाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नागपूर, 3 फेब्रुवारी : महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपने एकनाथ शिंदेंच्या मदतीने उद्धव ठाकरे यांचं महाविकासआघाडी सरकार पाडलं, पण आता महाविकासआघाडीसमोर त्यांना प्रभाव पाडण्यात अपयश आलं आहे. विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजप-शिंदे गटाला जोरदार धक्का बसला आहे, तर महाविकासआघाडीचा विजय झालाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गड समजला जाणाऱ्या नागपूरमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरएसएसचं मुख्यालयही नागपूरमध्येच आहे, त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे.

महाविकासआघाडीचा तीन जागांवर विजय

नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकासआघाडीच्या सुधाकर अडबोले यांनी भाजप पुरस्कृत नागो गाणार यांचा 7 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. अडबोले यांना 16,700 मतं मिळाली तर गाणार यांना 8,211 मतं मिळवण्यात यश आलं.

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विक्रम काळे यांचा विजय झाला. विक्रम काळे यांना 20,195 मतं मिळाली. अमरावती पदवीधर मतदारसंघात मोठा उलटफेर झाला. काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांना पराभवाची धूळ चारली.

हेही वाचा : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग राज्यसभेत शेवटच्या रांगेत बसणार, वाचा काय आहे कारण..

नाशिकमध्ये तांबेंचा विजय

नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेस बंडखोर सत्यजीत तांबे यांचा विजय झाला. काँग्रेसने या जागेसाठी सत्यजीत तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती, पण सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. यानंतर सत्यजीत तांबे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. यानंतर काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांचं पक्षातून निलंबन केलं आहे.

भाजपला फक्त एक जागा

कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी बाळाराम पाटील यांचा पराभव केला. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली, तर बाळाराम पाटील यांना फक्त 9,500 मतं मिळवण्यात यश आलं.

महाराष्ट्रातल्या या पाच शिक्षक-पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपला फक्त एकाच जागेवर यश मिळालं आहे. उरलेल्या तीन जागा महाविकासआघाडीला आणि एक जागा अपक्षाला मिळाली आहे. विधानपरिषद निवडणुकीचा हा निकाल भाजप तसंच शिंदे गटासाठी धक्का मानला जात आहे.

गडकरी-फडणवीसांच्या बालेकिल्ल्यातच धक्का

महाराष्ट्राच्या राजकारणात नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे भाजपचे दोन दिग्गज नेते आहेत. गडकरी केंद्रीय मंत्री आणि फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. या दोन्ही नेत्यांचं नागपूर होमग्राऊंड आहे आणि तिकडेच काँग्रेसने विधानपरिषदेची जागा खेचून आणली आहे. महाविकासआघाडी समर्थित उमेदवार सुधाकर अडबोले यांनी भाजप पुरस्कृत नागो गाणार यांना धक्का दिला आहे. ही जागा आतापर्यंत भाजपकडे होती. याशिवाय संघ मुख्यालयही नागपूरमध्येच आहे, त्यामुळे हा निकाल भाजपची चिंता वाढवणारा आहे.

हेही वाचा : सरकार कलम 80C आणि 80D कधी रद्द करणार? अर्थमंत्री म्हणाल्या...

तीन वर्षात तिसरा पराभव

नागपूरमध्ये भाजपचा मागच्या काही काळातला हा पहिला पराभव नाही. मागच्या तीन वर्षांमध्ये भाजपचा हा तिसरा पराभव आहे. तीन वर्षांपूर्वी भाजपला नागपूर जिल्हा परिषदेमध्येही पराभवाचा सामना करावा लागला होता. नागपूर जिल्हा परिषदेच्या 58 जागांपैकी काँग्रेसला 30, राष्ट्रवादीला 10, भाजपला 15 आणि इतरांना 2 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नव्हती. भाजपच्या या पराभवाचं कारण शिवसेनेचं वेगळं निवडणूक लढणं मानलं गेलं, कारण शिवसेनेने भाजपच्या व्होटबँकला धक्का दिला. एवढच नाही तर नितीन गडकरी यांचं गाव असलेल्या धापेवाडामध्ये काँग्रेसचे महेंद्र डोंगरे जिंकले होते.

ऑक्टोबर 2022 मध्ये नागपूर जिल्ह्याच्या पंचायत समिती अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही काँग्रेसने मोठा विजय मिळवला. पंचायत समितीच्या अनेक जागांवरही काँग्रेसला यश आलं, तर भाजपला या निवडणुकीत एकही प्रमुख पद मिळालं नाही. काँग्रेसने 13 पैकी 9 पंचायत प्रमुख पद पटकावली. भाजपसाठी हा पराभव जिव्हारी लागणारा होता, कारण बरेच नेते या भागातून येतात. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा गड मानला जातो.

हेही वाचा : 4 किलो सोन्याचा शर्ट घालायचा, नाशिकच्या गोल्डमॅनला 22 कोटींच्या घोटाळ्यात अटक

आता भाजपने नागपूरचा शिक्षक मतदारसंघही गमावला आहे, त्यामुळे मागच्या तीन वर्षांमधला भाजपचा घरच्याच मैदानावरचा हा तिसरा पराभव आहे. 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला विदर्भातून घवघवीत यश मिळालं होतं, पण 2019 मध्ये याच विदर्भात भाजपला मोठा फटका बसला, ज्यामुळे त्यांना 105 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

जुन्या पेन्शनमुळे नुकसान?

भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारला जुन्या पेन्शन योजनेविरुद्ध जाण्याचा फटका बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. सरकार ओपीएस पुन्हा लागू करणार नाही, असं फडणवीस विधानसभेत म्हणाले होते, पण शिक्षक मतदारांची नाराजी पाहता शिंदे-फडणवीस यांनी भूमिका बदलली आणि आपण ओपीएसबाबत नकारात्मक नसल्याचं स्पष्ट केलं, पण त्यानंतरही तीन ठिकाणी भाजपला पराभव पचवावा लागला.

मूड ऑफ नेशननेही वाढवली चिंता

मागच्याच आठवड्यात आलेल्या सी-व्होटर इंडिया टुडेच्या सर्व्हेनेही भाजपची चिंता वाढवली आहे. या सर्व्हेनुसार आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाविकासआघाडीला 48 पैकी 34 जागा जिंकता येतील, तर भाजप-शिंदे गटाला फक्त 14 जागांवर समाधान मानावं लागेल. 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपला 23 आणि शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. ही निवडणूक भाजप-शिवसेना एकत्र लढले होते.

First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Nagpur, Nitin gadkari