पुणे, 21 डिसेंबर: उत्तरेकडील राज्यात तीव्र थंडीची लाट आल्याने राज्यातील बहुतांशी ठिकाणी तापमानात घट झाली आहे. येत्या काही दिवसात उत्तर-मध्य भारतात तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. विदर्भात थंडीची लाट (Cold wave in vidarbha) आली असून अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. ही थंडीची आजही कायम राहणार आहे. पण उद्यापासून विदर्भासह महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी तापमानात पुन्हा काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडीची लाट आली नसली तरी, अनेक ठिकाणी तापमानाचा पारा प्रचंड घसरला आहे. राज्यातील सर्वात कमी तापमान जळगावात नोंदलं असून येथे किमान तापमानाचा पारा 7 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. अमरावती, वर्धा आणि नागपूर या तीन जिल्ह्यात थंडीची लाट आली असून या तिन्ही जिल्ह्यांना थंडीचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये अमरावतीत 7.7, वर्धा 8.2 तर नागपुरात 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याव्यतिरिक्त गडचिरोलीत 7.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
हेही वाचा-वातावरणातील तापमान 4 अंशाच्या खाली गेल्यास शरीराचं काय होतं?
दुसरीकडे, पुणे जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडली आहे. पुणे जिल्ह्यात शिरूर याठिकाणी सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून याठिकाणी तापमानाचा पारा 8.5 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. त्यापाठोपाठ हवेली, पाषाण, एनडीए याठिकाणी अनुक्रमे 10, 10.6 आणि 10.6 किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यातील इतरत्र भागातील तापमान 10 ते 17. 5 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. उद्यापासून पुण्यासह राज्यातील किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमानाची वाढ होण्याची शक्यता आहे.
21 Dec 2021, Pune mercury continue to follow gravity with min temperature lowest of the season being recorded in Pune at Shirur 8.5 Deg C and few other places around 10 Deg C Enjoy and take care too. pic.twitter.com/63nju0qqcV
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 21, 2021
सोमवारी पडलेल्या तीव्र थंडीमुळे जम्मू काश्मीर खोऱ्यात अनेक जलाशयं आणि पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिन्या गोठल्या आहेत. येथील तापमान गोठण बिंदूच्या खाली गेलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतासह महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे प्रसिद्ध दल सरोवर देखील गोठलं आहे. वायव्य भारतात येत्या दोन दिवसांत थंडीची मध्यम ते तीव्र लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weather forecast, महाराष्ट्र