मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

काय सांगता, आंघोळीला या गावात चक्का ग्रामपंचायत देतं पाणी, तेही मोफत

काय सांगता, आंघोळीला या गावात चक्का ग्रामपंचायत देतं पाणी, तेही मोफत

फोटो क्रेडिट - लोकमत

फोटो क्रेडिट - लोकमत

रेंगेपार कोहळी गावाची लोकसंख्या 1879 असून 120 कुटुंब येथे राहतात. याठिकाणी दीड हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसविण्यात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bhandara, India
  • Published by:  Khushalkant Dusane

भंडारा, 14 नोव्हेंबर : राज्य सरकारकडून संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात भंडारा जिल्ह्यातील रेंगेपार (कोहळी) गावाने राज्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले होते. यानंतर या गावाने आता आणखी एक चांगले पाऊल टाकत कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. या गावाने आता वृक्षतोड थांबविण्यासाठी पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून या गावातील लोकांना हिवाळ्याच्या दिवसात सकाळी 6 वाजल्यापासून मोफत गरम पाणी पुरविले जात आहे. आठवड्याभरापूर्वी सुरू केलेल्या या उपक्रमाचा लाभ गावातील 120 कुटुंब घेत आहेत. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. येथील लोकांनी पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, या हेतूने ग्रामपंचायतीच्या मालकीच्या तब्बल 100 एकर परिसरात वृक्ष लागवड केली आहे.

आता थंडीच्या दिवसात पाणी गरम करण्यासाठी अतिरिक्त सरपण लागतो. त्यामुळे वृक्षतोड होऊ नये म्हणून आता ग्रामपंचायतीने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या गावाचे सरपंच मनोहर बोरकर यांच्या पुढाकाराने याठिकाणी सोलर वॉटर हिटर सयंत्र लावण्यात आले आहे. तसेच यासाठी दोन लाख 98 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामसेवक एच.व्ही. लंजे यांनी दिली. लोकमतने याबाबचे वृत्त दिले आहे.

गावासाठी एकच सौर हीटर -

रेंगेपार कोहळी गावाची लोकसंख्या 1879 असून 120 कुटुंब येथे राहतात. याठिकाणी दीड हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसविण्यात आली आहे. तसेच सोलर पॅनलद्वारे पाणी गरम होते. सकाळी 6 वाजल्यापासून 120 कुटुंबाना गरम पाणी दिले जाते. विशेष म्हणजे यासाठी कोणताही मोबदला घेतला जात नाही. सकाळी 6 ते 10 असे चार तास गरम पाणी दिले जाते. तसेच गृहकर आणि पाणीपट्टी करातून याचा खर्च भागविला जात आहे. या उपक्रमात गावातील सर्वच लोक सहभागी झाले आहेत.

हेही वाचा - आता गरिबाची पोरंही शिकणार विदेशात, एक हजार विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी 'एकलव्य'चा पुढाकार

गावकऱ्यांना नळ योजनेद्वारे मुबलक पाणी दिले जाते. गरम पाणी पुरविण्याची कल्पना त्यातूनच आली. पर्यावरण संरक्षणाचा विचार करून सौर उर्जेद्वारे गरम पाणी गावकऱ्यांना दिले जाते. सकाळी आंघोळ करून ग्रामस्थांनी आपल्या कामाला निघावे. हा यामागचा उद्देश आहे, असे रेंगेपार कोहळीचे सरपंच मनोहर बोरकर म्हणाले.

2011 मध्ये लाखनी तालुक्यातील रेंगेपार गावाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून राज्यातून पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळवले होते. येथील ग्रामपंचायत नेहमी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते. या गावाला स्मारक ग्राम योजनेचे बक्षीसही मिळाले आहे.

First published:

Tags: Bhandara Gondiya