नागपूर, 24 डिसेंबर : सेलिब्रिटी मास्टर शेफ विष्णू मनोहर हे नाव तसं सर्वांच्याच परिचयाच आहे. एकाहून एक सरस लज्जतदार खाद्यपदार्थांची मेजवानी तयार करणारे विष्णू आता तब्बल पंधरावा विक्रम घडवण्याच्या मार्गावर आहेत. ख्रिसमसच्या दिवशी विष्णू मनोहर आणि ब्लाइंड रिलीफ असोसिएशनच्या मुंडले हायस्कूलचे विद्यार्थ्यांसोबत 5 हजार किलोंची ‘समरसता भाजी’ तयार करणार आहेत. 14 रेकॉर्ड नंतर आणखी एक नवा विक्रम विष्णू यांच्या नावे नोंदविला जाणार आहे.
शाळेतील बाराशे विद्यार्थी एकत्र जमून या उपक्रमात सहभागी होणार आहे. यात विद्यार्थी आपल्या घरून भाजी आणणार असून उर्वरित भाजी आम्ही, शाळा व पालक पुरवणार आहोत. भाजी तयार करायला दोन ते तीन तासाचा अवधी लागणार असून सकाळी आठ वाजता भाजी बनवण्यास सुरुवात होणार आहे. सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून शाळेतील विद्यार्थी लेझीम, बँड पथक अशा सगळ्या उत्साहाच्या वातावरणात नागपूरकरांच्या उपस्थितीत हा उपक्रम यशस्वी होणार आहे.
दहा बाय दहा फुटाची भली मोठी कढई यासाठी तयार करण्यात आलेली आहे. जगात यापूर्वी अशा प्रकारचा उपक्रम कोणीही राबविला नसल्याने या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे. विशेषता या विक्रमाची नोंद डिस्कवरी चैनलने घेतली असून त्यांची टीम या विक्रमाची संपूर्ण प्रक्रिया व डॉक्युमेंटेशन करणार आहे.
भाजीची मेजवानी
समरसता भाजी सर्वांना मोफत वितरित करण्यात येणार असून आपण सर्वांनी घरून डबे घेऊन यावे. सकाळी दहा वाजता या भाजीचे वितरण साऊथ अंबाझरी रोडवरील मुंडले हायस्कूलच्या प्राणांगणात होणार असून आपण सर्व या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन विष्णू मनोहर यांनी केले.
सुट्ट्यांचा घ्या भरपूर आनंद; ख्रिसमस आणि नववर्षासाठी आहे खास ऑफर, पाहा video
शाळेची सिल्वर जुबली
यावर्षी शाळा पंचविसाव्या वर्षात पदार्पण करत असून शाळेची ही सिल्वर जुबली असल्याने शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर समरसता भाजीचा उपक्रम प्रसिद्ध मास्टर शेफ विष्णू मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील 1200 विद्यार्थी यात सहभागी होणार आहे.
ख्रिसमसनिमित्त घरीच बनवा स्वादिष्ट डोनट, भन्नाट रेसिपीचा पाहा video
विद्यार्थ्यांना आहारात भाजी पोळी या खाद्य पदार्थाची गोडी निर्माण व्हावी तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी अथवा नोकरीसाठी बाहेरगावी गेले असता, स्वतःची भूक भागवता येईल इतपत स्वतः त्यांना स्वयंपाक यावा, असे विविध उद्देश डोळ्यापुढे ठेवून हा उपक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती ब्लाइंड रिलीफ असोसिएशनचे अध्यक्ष मकरंद पांढरीपांडे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.