नागपूर, 22 डिसेंबर : विरोधी पक्षात असलेल्या उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडू लागली आहेत. काही दिवसांपूर्वी पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असा, दावा संजय राऊतांनी केल्यानंतर आता भुजबळांनीही मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलंय. राष्ट्रवादीचा आमदार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला शरद पवारांना आवडेल , असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलंय. ते नागपुरातल्या एका मेळाव्यात बोलत होते.
शरद पवारांना हारतुरे देण्याऐवजी आमदार, खासदार भेट द्या. पक्ष वाढवा, असं आवाहनही भुजबळांनी केलंय. महाविकास आघाडीचं भवितव्य नक्की नसताना प्रत्येक पक्ष पुढचा मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचा होईल, असं सांगत सुटलाय, त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण यावरुन वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काय म्हणाले भुजबळ?
'शरद पवार यांच्या सारखा ध्यानी नेता सध्या देशात नाही. क्रीडा, सांस्कृतिक कुठलंही क्षेत्र असो शरद पवारांना सगळ्या गोष्टींची माहिती आहे. शरद पवार यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा व्हावा हे वाटतं. कार्यकर्ते पवार यांना हार शाल देण्यापेक्षा त्यांना आमदार, खासदार, नगरसेवक भेट दिले पाहिजे', असं छगन भुजबळ म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसलाही मुख्यमंत्रीपदाची स्वप्न, शरद पवारांना काय हवंय? छगन भुजबळांनी सांगितलं#NCP #ChaganBhujbal #SharadPawar pic.twitter.com/VXn8RGpYdP
— News18Lokmat (@News18lokmat) December 22, 2022
महिला मुख्यमंत्र्यावरून ठाकरेंचे संकेत
काहीच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी महिला मुख्यमंत्र्यांवरून केलेलं एक विधान चर्चेत आलं होतं. एक कर्तबगार माणूस मग ती महिला असेल किंवा पुरुष आपल्याला मुख्यमंत्रीपदी बसावयचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chagan bhujbal, NCP, Sharad Pawar