नागपूर, 3 जून : भाजप नेते आणि राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे वडील डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचं निधन झालं आहे. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक होते. तसेच ते चंद्रपूरातील प्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांचे आज संध्याकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास निधन झालं. नागपूर येथील किंग्जवे या रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मुनगंटीवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर सच्चिदानंद मुनगंटीवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
"माझे सहकारी सुधीर मुनगंटीवार यांचे वडील, रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक डॉ. सच्चिदानंदजी मुनगंटीवार यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. सुधीरभाऊ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. डॉ. सच्चिदानंदजी मुनगंटीवार यांनी रा. स्व. संघ, लोकमान्य टिळक स्मारक मंडळ, चिन्मय मिशन अशा अनेक माध्यमातून सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान नेहमीच स्मरणात राहील. एक भक्कम आधारस्तंभ म्हणून ते आम्हा सर्वांच्या पाठिशी उभे असत.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो", अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
माझे सहकारी श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे वडिल, रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक डॉ. सच्चिदानंदजी मुनगंटीवार यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले.
सुधीरभाऊ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. @SMungantiwarpic.twitter.com/PNlQB1l1Zi
(राज्यसभेच्या निवडणुकीआधी महाविकास आघाडीची धाकधूक का वाढली?)
डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार हे 91 वर्षांचे होते. त्यांचे हृदय विकाराने निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक, लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष, चिन्मय मिशनचे अध्यक्ष, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीचे अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या. त्यांनी 1967 मध्ये भारतीय जनसंघातर्फे चंद्रपूर विधानसभेची निवडणूक देखील लढली होती. विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव तर चंद्रपूरातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. संदीप मुनगंटीवार हे त्यांचे कनिष्ठ चिरंजीव आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी सुचिता चकनलवार, स्नुषा, जावई, नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे.
त्यांचे पार्थीव शनिवार 4 जून 2022 रोजी सकाळी साडेदहा वाजता चंद्रपूर येथे आणण्यात येईल. त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी साडेचार वाजता त्यांच्या कस्तुरबा चौक निवासस्थानाहून निघेल. शांतीधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.