गोंदिया, 1 एप्रिल : जिल्ह्यातील सात बाजार समिती निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. जिल्ह्यातील गोंदिया, आमगाव, देवरी, गोरेगाव, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, तिरोडा या सात बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. सहकार क्षेत्रावर पकड मजबूत ठेवण्यासाठी ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.
भाजप, राष्ट्रवादीची युती
या निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याचं पहायला मिळत आहे. आमगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादीने युती केली आहे. या निवडणुकीसाठी भाजपचे 11 तर राष्ट्रवादीच्या 7 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे देवरी व गोंदिया या ठिकाणी सुद्धा भाजप व राष्ट्रवादी युती करून निवडणूक लढणार आहेत, अशी माहिती भाजपचे गोंदिया जिल्हाध्यक्ष केशराव मानकर यांनी दिली.
काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय
मानकर पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही आमगाव बाजार समितीसाठी राष्ट्रवादीसोबत युती केली आहे. देवरी व गोंदिया या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादीसोबत युती करणार आहोत. तर तिरोडा, गोरेगाव व अर्जुनी मोरगाव या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवू, सातवी बाजार समिती सडक अर्जुनीच्या निवडणुकीत इतर पक्षासोबत युती करू असं त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.