मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : पुस्तकंच वाचकांपर्यंत पोहचणार! नागपूरच्या तरुणांनी सुरू केलं ‘लायब्ररी ऑन व्हील’

Video : पुस्तकंच वाचकांपर्यंत पोहचणार! नागपूरच्या तरुणांनी सुरू केलं ‘लायब्ररी ऑन व्हील’

शहरातील विविध भागात वाहनात पुस्तकाचे स्टॉल मांडून फिरत्या लायब्ररीचा उपक्रम नागपुरातील तरुणांनी राबविला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 22 नोव्हेंबर : इत्थंभूत माहिती मिळवण्याचे आणि डिजिटल इंटरटेनमेंटचे अनेक पर्याय एका क्लिकवर उपलब्ध झाले आहेत. तंत्रज्ञानाच्या डिजिटल युगात तरुणाईत पुस्तकांची आवड जोपासणारा वर्ग तसा दुर्मीळच. मात्र या समजुतीस छेद देण्याचे कार्य नागपूरकर तरुणांच्या वतीने 'लायब्ररी ऑन व्हील' सारखा अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे. तरुणाईत वाचनाची आवड निर्माण होऊन वाचन संस्कृती दृढ व्हावी, या उद्देशाने शहरातील विविध भागात वाहनात पुस्तकाचे स्टॉल मांडून फिरत्या लायब्ररीचा उपक्रम नागपुरातील तरुणांनी राबविला आहे.

आपल्या जवळ असलेली पुस्तके वाचून झाल्यानंतर त्याचा उपयोग इतरांना देखील व्हावा, वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी, हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून लायब्ररी ऑन व्हील उपक्रमाला सुरुवात झाली. समाजात काही लोकांना पुस्तक वाचनाची आवड असली तरी महागडे पुस्तक घेणे परवडत नाही. अनेकांना लायब्ररीत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे लायब्ररी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एक पर्याय म्हणून शहरातील विविध कॅफे आणि मुख्य स्थळी पुस्तकांचे स्टॉल लावून विविध पुस्तक उपलब्ध करून देतो. या उपक्रमाला नागपूरकर तरुणांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यातून पुस्तक वाचकांचा मोठा वर्ग तयार होत असल्याचे समाधान या संकल्पनेची प्रणेते लिखित अग्रवाल यांनी व्यक्त केले. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून ठिकाणाची माहिती

प्रत्येक रविवार शहरातील मुख्य स्थळी अथवा जेथे तरुणाईचा जास्त वावर असतो, अशा ठिकाणी तसेच कॅफेचे संचालक आणि स्वयंसेवकांच्या मदतीने ही लायब्ररी  विविध ठिकाणी पुस्तके उपलब्ध करून देते. आपल्याला आवडलेले पुस्तक त्या पुस्तकाच्या ठरावीक अनामत  रकमेच्या बदल्यात नागरिक घेऊन जाऊ शकतात. वाचून झाल्यानंतर पुस्तकं परत करून अनामत रक्कम मिळवू शकतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून, तसेच मॅसेजच्या माध्यमातून आमचे स्थळ वाचकांना कळते, अशी माहिती स्वदेस दास यांनी दिली. 

हजारो वर्षांपूर्वीचं वॉटर मॅनेजमेंट पाहण्याची सुवर्णसंधी, पाहा Video

इतिहास आणि साहित्यावर वैचारिक चर्चा

भविष्यात हा उपक्रम खेड्या पाड्यातील दुर्गम भागात देखील राबविण्याचा आमचा मानस आहे. पुस्तक वाचकांच्या आणि वाचन संस्कृतीची जोपासना करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांची यात साथ लाभावी, अशी अपेक्षा या उपक्रमातील सक्रिय सभासद ऋतुजा हिरुळकर यांनी व्यक्त केली. आपली संस्कृती, इतिहास आणि साहित्य यासारख्या विषयांवर वैचारिक चर्चा व्हावी, विचारांची देवाणघेवाण व्हावी, या उद्देशाने अनेकदा चर्चासत्राचे आयोजन देखील करण्यात येत असल्याची माहिती ऋतुजा यांनी दिली.

First published:

Tags: Local18, Nagpur