नागपूर, 27 मार्च: आपलंही हक्काचं घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. पण पूर्ण हयात कष्ट उपसूनही अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होत नाही. अशातच नागपुरात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. नवीन घराची वास्तूशांती झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी घरमालकाचं निधन झालं आहे. त्यामुळे नवीन घरात राहण्याचं त्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं आहे. घरापासून काही अंतरावरच त्यांना एका भरधाव टिप्परने धडक दिली आहे. यामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे.
रमेश तांबेकर असं मृत पावलेल्या 54 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. त्यांनी बेसा-वेळा हरी मार्गावर घोगली येथील वेदनगरात घर बांधलं होतं. दोन दिवसांपूर्वी 23 मार्च रोजी त्यांच्या घराचं वास्तूपूजनही झालं होतं. अनेक पाहुण्यांनी घराला भेट देऊन भोजन करून गेले होते. नवीन घर बांधल्यामुळे कुटुंबातही आनंदाचं वातावरण होतं. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. वास्तूपूजनानंतर दुसऱ्याच दिवशी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा- व्हॉट्सअॅपवर मुलींचा व्हायचा सौदा मग लॉजवर चालायचं धक्कादायक कृत्य; मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
घटनेच्या दिवशी शुक्रवारी मृत रमेश तांबेकर हे आपले मित्र मदने यांच्यासोबत दुचाकीने मानेवाड्याला गेले होते. तेथील काम उरकल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास दोघंही दुचाकीने परत घरी येत होते. दरम्यान घरापासून काही अंतरावर असणाऱ्या घोगली येथील नाल्याच्या पुलाजवळ एका टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली आहे. या अपघातात पाठीमागे बसलेल्या तांबेकर यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मदने हे देखील जखमी झाले.
हेही वाचा-GFला भेटायला गेलेल्या तरुणासोबत घडला घात; हत्येच्या थरारक घटनेनं जळगाव हादरलं!
हा अपघात घडताच आरोपी टिप्परचालक वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. या अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. यातीलच एकाने याची माहिती हुडकेश्वर पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत तांबेकर हे महापालिकेत कामाला होते. नवीन घराच्या वास्तूशांतीनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Crime news, Nagpur