नागपूर, 4 मार्च : दुचाकीवर ट्रिपल सीट जात हातात सुरा घेऊन लुटमार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी सध्या फरार आहे. राकेश उर्फ रविशंकर तिवारी आणि निलेश आदेश सीडाम असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं माव आहे. तसंच तिसरा आरोपी सचिन लोहकरे हा अजूनही फरार आहे.
वाडी पोलिसांच्या रात्रीची गस्त घालणाऱ्या पथकाने पाठलाग करून आरोपींना पकडले. अटक केलेले दोन्ही आरोपी नागपुरातील आठवामैल परिसरात राहणारे आहेत. या आरोपींकडून 2 चोरी करण्यात आलेले मोबाईल आणि 1 सुरा मिळाला असून त्यांनी हिंगणा रोड टी पॉईंटवर दोन जणांना लुटल्याचं कबूल केले आहे. तसंच वाडीतील भारत पेट्रोल पंप सुद्धा लुटण्याचा प्रयत्न केल्याची माहिती वाडी पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही काळामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकीकडे बीडमध्ये घरमालकावर हल्ला करून चोरी करण्यात आल्याची घटना घडली असताना दुसरीकडे नागपूरमध्येही गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी आता समोर येत आहे.
हेही वाचा-6 वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार आणि हत्या, 4 दिवसांत निर्णय देत 3 दोषींना सुनावली फाशीची शिक्षा
खून, बलात्कार, दरोडीखोरी यांसारख्या घटनामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार होत आहे. त्यामुळे गृहमंत्रालय आणि पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांवर अंकूश ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, म्हणजे असे प्रकार कमी होतील, अशी अपेक्षा नागरिक आता व्यक्त करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.