26 फेब्रुवारी : नागपूर ही दीक्षाभूमी आहे त्यामुळे संघाच्या विचाराविरोधात आपण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचं काँग्रेसचे नेते डाॅ.नितीन राऊत यांनी केले आहे. पक्षाने आदेश दिल्यास आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विरोधात नागपूर लोकसभा निवडणूक लढवू असंही नितीन राऊत म्हणाले.
काँग्रेसच्या अनेक राष्ट्रीय नेत्यांनी आपल्याला याबाबत विचारणा केली असल्याचं सांगतानाच नितिन राऊत यांनी नागपूर लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. १६ व्या लोकसभा निवडणुकीत भाजपने नागपूरची जागा काँग्रेसकडून खेचून आणली आणि नितीन गडकरी पहिल्यांदा खासदार झाले. सध्या नितीन गडकरी केंद्र सरकारमध्ये केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात काँग्रेसला नागपूर लोकसभा निवडणूक सोपी नाही, असे जानकार सांगतात.
मात्र काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी नितीन गडकरींविरोधात कंबर कसली आहे. नागपुरातील साडेचार लाख बौद्ध मतदार आपल्या पाठीशी आहे. शिवाय बहुजन समाजातल्या इतर मतांच्या मदतीने ही निवडणूक जिंकू शकतो, असा आत्मविश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
नागपुरात गेल्या लोकसभा निवडणुकीत विलास मुत्तेमवार काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांचा नितीन गडकरी यांनी दारुण पराभव केला होता. आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची विलास मुत्तेमवार यांची इच्छा कधीच लपून राहिलेली नाही. नितीन राऊत आणि विलास मुत्तेमवार यांच्यातील मतभेद जगजाहीर आहे. त्यामुळे विलास मुत्तेमवार यांचा पत्ता कापण्यासाठी दलित कार्ड पुढे करत नितीन राऊत लोकसभेसाठी तयारीत असल्याच्या शक्यताही वर्तवण्यात येत आहेत.
नागपुरात विलास मुत्तेमवार यांच्या गटाने पुढाकार घेवून पक्ष विरोधी कारवाया करण्याचे कारण सांगत सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून काढण्यास भाग पाडले. सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत एकत्र आहेत. त्यामुळे विलास मुत्तेमवार गटावर दबाव निर्माण करण्यासाठी नितीन राऊतांचे हे प्रयत्न तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nagpur, Nitin raut, काँग्रेस, नागपूर, नितीन राऊत