लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उद्या मतदान, पूर्व विदर्भात जातीची समीकरणे प्रभावी ठरणार

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उद्या मतदान, पूर्व विदर्भात जातीची समीकरणे प्रभावी ठरणार

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी सगळी ताकद पणाला लावली. तळपतं ऊन अंगावर घेत रोड शो आणि पदयात्रा काढत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार केला.

  • Share this:

मुंबई, 10 एप्रिल- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघांत मंगळवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. 20 राज्यातील 91 लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. राज्यातील पूर्व विदर्भातल्या 7 अर्थात नागपूरसह वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर आणि यवतमाळ-वाशीम या सात मतदारसंघात गुरुवारी (11 एप्रिल) पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. भाजपचे प्राबल्य व पंचबुद्धेंसारखे कडवे समर्थक रिंगणात असल्याने या निवडणुकीत जातीपातीची समीकरणे प्रभावी ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी सगळी ताकद पणाला लावली. तळपतं ऊन अंगावर घेत रोड शो आणि पदयात्रा काढत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार केला. नागपुरात केंद्रिय मंत्री नितीन गडकरींनी रोड शो करत जोरदार शक्तीप्रदर्शन केते तर गडकरींविरोधात रिंगणात असलेल्या नाना पटोलेंनीही बाईक रॅली काढली. नागपुरातल्या या लढतीकडे उभ्या देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान पहिल्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती आहे.

प्रफुल्ल पटेल सध्या येथे तळ ठोकून

विदर्भातील प्रमुख लढतीपैकी एक भंडारा-गोंदियात प्रतिष्ठा पणाला लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल सध्या येथे तळ ठोकून आहेत. भाजपचे प्राबल्य, निवडणुकीत प्रभावी ठरणारी जातीपातीची समीकरणे व पंचबुद्धेंसारखे कडवे समर्थकच रिंगणात असल्याने त्यांच्या विजयासाठी प्रफुल्ल पटेल येथे विदर्भात अडकले आहेत.

जातीपातीची समीकरणे प्रभावी

निवडणुकीत जातीची समीकरणे प्रभावी ठरत असल्याने राष्ट्रवादी, भाजप व वंचितने कुणबी समाजालाच उमेदवारी दिली आहे.  भंडारा-गोंदियात कुणबी समाज बहुसंख्य आहे. खालोखाल पोवार, नवबौद्ध, मारवाडी व तेली समाजाचेही प्राबल्य आहे. परिणामी कुणबी समाजाची मते समसमान विभागली जाण्याची शक्यता आहे. परिणामी इतर जातीच्या मतांवर सर्वांचा डोळा असून त्यासाठी प्रचंड चुरस आहे. याशिवाय लोकसभा मतदारसंघातील सहापैकी 5 आमदार भाजपचे असून 1 काँग्रेसचा आहे.

राष्ट्रवादीने 2014 मध्ये ही जागा भाजपकडून हिसकावली होती...

गेल्यावर्षी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. येथून 4 वेळा खासदार झालेल्या प्रफुल्ल पटेलांचा 2014 मध्ये पराभव झाला होता. त्यांचा पराभव करणारे नाना पटोलेच आता नागपूरमधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यामुळे विजयाची जबाबदारी पटेलांवर आली आहे. खरे तर या निवडणुकीत स्वत: पटेल हेच उमेदवार असणार होते. मात्र, त्यांच्या राज्यसभेच्या खासदारकीची अजून सव्वातीन वर्षे शिल्लक आहेत. त्यांनी राजीनामा दिल्यास पक्षाचे संख्याबळ घटेल, म्हणून खुद्द पवारांनीच त्यांना लोकसभेत उभे न राहण्याबाबत सुचना दिल्याचे समजते.

अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर सुरक्षा यंत्रणेची करडी नजर

विदर्भात 14 हजार 189 मतदान केंद्रांवर उद्या मतदान होणार आहे.  निवडणूकीची तयारी पूर्ण झाली आहे. पोलिंग पार्टीज रवाना झाल्या आहेत. राज्यात निवडणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्याबरोबरच मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) जवळपास 110 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 11 हजारांवर जवानांचा समावेश असून मतदान होईपर्यंत त्यांना विभागवार नेमण्यात येणार आहे. नक्षलग्रस्त गडचिरोलीमधील 500 अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर सुरक्षा यंत्रणांची करडी नजर आहे.  नक्षलग्रस्त भागात होणाऱ्या मतदानासाठी 88 सुरक्षा कंपन्यांसह वायू दलाची एमएस-17 ही तीन हॅलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत.

- जगदीश काटकर, निवडणूक निर्णय अधिकारी

 

एअर स्ट्राईक ते राफेल करार, मोदींची UNCUT मुलाखत

First published: April 10, 2019, 9:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading