विधानसभेत रंगणार आज भाजप विरुद्ध शिवसेना 'सामना'!

विधानसभेत रंगणार आज भाजप विरुद्ध शिवसेना 'सामना'!

सावरकरांच्या विषयावरून काँग्रेस-शिवसेनेच्या मतभेदांचा फायदा घेत दोन्ही पक्षांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

प्रफुल साळुंखे, नागपूर 16 डिसेंबर : राज्य विधिमंडळच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे आजपासून सुरवात होतेय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वीर सावरकर यांच्या अपमानचा मुद्दा विधिमंडळा बाहेर आणि सभागृहात आणण्याची रणनीती भाजपने आखलीय. तर सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात झालेल्या भ्रष्टाचारचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता आहे. रविवारी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेत त्याचे संकेतही मिळाले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जे विधान केलं होतं त्याला आक्षेप घेत राहुल यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली होती. त्यावरून राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही भाजपने दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारनं भाजपने मंजूर केलेल्या विकास कामांना स्थगिती दिल्यामुळेही विरोधकांमध्ये संताप आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या अधिवेशनाचा दिवस आज या सगळ्या मुद्द्यांवरून गाजण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी फडणवीस वापरणार 'हे' अस्त्र!

तर याच मुद्यावरून शिवसेनेची कोंडी करण्याची रणनीतीही भाजपने आखलीय. हे अधिवेशन आठवडाभर चालणार आहे. नागपूर अधिवेशन हे राजकीय दृष्ट्या कायम वादळी आणि खळबळजनक ठरलं आहे. त्यामुळे हे अधिवेशन कसं पार पडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन भिन्न विचारसरणी असलेल्या पक्षांचं हे सरकार असल्याने त्यांच्यात मतभेद आहेत हे आता काही नवं राहिलेलं नाही. त्यातच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्यावरून वाद निर्माण झालाय. त्याचा फायदा घेत उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी फडणवीसांनी रणनीती तयार केली असून त्याचे पडसाद आता विधिमंडळात बघायला मिळणार आहेत.

अजित पवारांचा भाजप प्रदेशाध्यक्षांसोबत विमान प्रवास, राजकीय चर्चांचं 'टेक ऑफ'

त्याचाच एक भाग म्हणून, सावरकरांच्या मुद्दा हा राज्यभर तापविण्याची योजना भाजपने आखली आहे. भाजप राज्यभर 'मी सावरकर, आम्ही सगळे सावरकर' कँपेन करणार आहे. विधिमंडळातही भाजप आक्रमकपणे सावरकरांचा मुद्दा मांडणार असून त्यावरून वादळ होण्याची शक्यता आहे. याआधी खासदार संजय राऊत यांनी सावरकरांच्या मुद्यांवर तडजोड नाही असं काँग्रेसला सुनावलं. त्याचबरोबर सावरकर हे महान देशभक्त होते. आम्ही नेहरूंना, गांधी मानतो, तुम्ही सावरकरांना माना असं म्हटलं होतं.  सावरकरांच्या विषयावरून काँग्रेस-शिवसेनेच्या मतभेदांचा फायदा घेत दोन्ही पक्षांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून होण्याची शक्यता आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Published by: Ajay Kautikwar
First published: December 16, 2019, 7:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading