माझाही फोन टॅप केला असावा, काँग्रेसच्या महिला मंत्र्यांनी व्यक्त केला संशय

माझाही फोन टॅप केला असावा, काँग्रेसच्या महिला मंत्र्यांनी व्यक्त केला संशय

'भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे, ही केंद्र सरकारची दादागिरी आहे'

  • Share this:

अमरावती, 25 जानेवारी : फोन टॅपिंग प्रकरण आणि भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आल्यामुळे भाजपवर विरोधकांनी घणाघात केला आहे. काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या आणि  महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनीही आपला फोन टॅप केला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्या अमरावतीत बोलत होत्या.

भाजपचं सरकार असताना विरोधीपक्षांचे फोन टॅप केले जात होते, असा आरोप करण्यात येत होता. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनीही अशा प्रकारचा आरोप केला होता. त्यामुळे गृहमंत्रालयाने आता या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे. महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनीही  कदाचित माझाही फोन टॅप केला असावा अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. याप्रकरणाची सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.

तसंच, राज्य शासनाला विश्वासात न घेता केंद्र सरकारने भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे, ही केंद्र सरकारची दादागिरी आहे. ही दादागिरी कितपत सहन करायची हा प्रश्न आहे. हिंदुस्थानात अशा प्रकारची दादागिरी सहन केल्या जाणार नाही, अशी टीकाही यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर केली.

शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

दरम्यान, भीमा कोरेगाव हिंसाचाराशी संबंधित तपास राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी(National Investigation Agency )कडे सोपवण्यात आला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारवर टीका केली आहे. 'सत्य बाहेर येण्याच्या भितीमुळे केंद्र सरकारने या प्रकरणात NIA कडे तपास दिला आहे,' असा घणाघाती आरोप शरद पवार यांनी केला आहे.

'कायदा व सुवव्यवस्था हे राज्य सरकारचं काम आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांनी तारतम्य ठेवलं नाही. एल्गार परिषदेत चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली. अन्यायाबद्दल बोलणं म्हणजे नक्षलवाद नव्हे. आम्ही एसआयटीची मागणी केल्यानंतर केंद्र सरकारने कुरघोडी केली आहे. सत्य बाहेर या भितीनं एनआयएकडे तपास,' असं पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणातील तपासाबाबत महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पोलिसांशी आढावा बैठक घेतली होती. मात्र आता या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविल्यानंतर महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2020 04:45 PM IST

ताज्या बातम्या