राहुल खंडारे, बुलडाणा, 21 मे: बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील आरोग्य कॉलनीत राहणाऱ्या एका तरुणानं उशीनं तोंड दाबून आपल्या पत्नीची हत्या (Wife murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीनं मध्यरात्री पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः घटनेची माहिती दिली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात (Accused husband arrest) घेतलं असून घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला आहे. तसेच मृत पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी समोसा उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. शेगाव परिसरात निर्घृण हत्येची ही दुसरी घटना आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित 28 वर्षीय आरोपी पतीचं नाव शिवाजी कैलास आढाव असू तो मुळचा संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा येथील रहिवासी आहे. आरोपी आढाव गेल्या काही दिवसांपासून आपली पत्नी संजीवनी (वय- 22) हिच्यासोबत शेगाव येथील आरोग्य कॉलनीत भाड्यानं खोली घेऊन राहत होता. आरोपी पती आणि मृत पत्नी संजीवनी यांच्यात नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत वादविवाद होत असायचा. कालही पती पत्नीचा किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी आरोपी पतीनं रागाच्या भरात पत्नी संजीवनी हिच्या तोंडावर उशीनं दाबून तिची निर्घृण हत्या केली.
मध्यरात्रीच्या सुमारास आरोपीनं हत्या केल्यानंतर स्वत: शहर पोलीस ठाण्यात येऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीला पतीला ताब्यात घेवून पुढील तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर घटनास्थळी धाव घेऊन मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सईबाई मोटे सामान्य रूग्णालयात पाठवला आहे. त्याचबरोबर घटनेची माहिती मृत महिलेच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.
हे वाचा-पुण्यात खळबळ : 13 वर्षाच्या मुलाने जन्मदात्या पित्याची केली निर्घृण हत्या
शहर पोलिसांनी रात्री अडीचच्या सुमारास मृत महिलेच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिल्यानंतर माहेराकडील नातेवाईक त्वरित रूग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी सांगितलं की, आरोपी आणि त्यांची मुलगी संजीवनी यांचा काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र आरोपीला दारुचं व्यसन असल्यानं तो मृत मुलीला नेहमी त्रास देऊन मारहाण करायचा. याबाबत याआधीही पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. मात्र पोलिसांनी आपसात समेट घडवून आणल्यानंतर त्यांचा संसाराचा गाडा पुन्हा सुरळीत झाला होता. पण काल अचानक आरोपीनं रागाच्या भरात पत्नीची हत्या केली आहे. या घटनेचा तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Buldhana news, Crime news, Murder, Wife and husband