बीड, 24 मे : एकाच कुटुंबातील 3 जणांची निघृण हत्या केल्याच्या घटनेनं बीड हादरलं आहे. शहरातील शुक्रवार पेठ भागात आज दुपारी 3 जणांची हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. कौटुंबिक वादातून हे तिहेरी हत्याकांड झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता याप्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीनेच दोन मुलांसह पत्नीची क्रूरपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पहाटे झोपेत असतानाच खून केल्याची आरोपी पती संतोष कोकणे याने कबुली दिली आहे. खून केल्यानंतर आरोपी पतीने आज दुपारी स्वतः पोलिसांत जाऊन पत्नी आणि मूल बेपता असल्याची तक्रार करत बनाव करण्याचा प्रयत्न उघड झाला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
संगीता संतोष कोकणे ( वय 31 ) , संदेश संतोष कोकणे ( अंदाजे वय 10 )व मयूर संतोष कोकणे ( वय 7 ) मयतांची नावे आहेत. यात दोन्ही माय लेकाचे मृतदेह एका खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले तर तिसऱ्या मुलाचा मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये आढळून आला आहे. या प्रकरणात आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विशेष म्हणजे पती संतोष कोकणे हा पत्नी आणि मूल बेपत्ता आहेत ही तक्रार पेठ बीड पोलीस ठाण्यात देण्यासाठी आला होता. यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. संगीता आणि संदेश या दोघाची ठेचून निर्घृणपणे हत्या केली. तर 7 वर्षीय लहान मुलाला पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून मारल्याचा अंदाज आहे. संशयित आरोपी म्हणून पतीला ताब्यात घेतल्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत त्यानेच पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि दोन्ही मुलांना मारल्याचं कबूल केलं आहे.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.