जालना, 25 मे : लॉकडाऊनच्या काळातही महाराष्ट्रातील गुन्हे कमी होत नसल्याचं चित्र आहे. त्यातच जालन्यातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. एका तीन महिन्याच्या चिमुकल्याला घरासमोरील पाण्याच्या टाकीत टाकून जीवे मारल्याची हृदयद्रावक घटना आज अंबड शहरात उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली.
शहरातील आंबेडकर नगर भागात राहणाऱ्या पायल विजय जाधव या महिलेनं तिच्या 3 महिन्याच्या मुलास रात्री एक वाजता दूध पाजून घरातील पलंगाला असलेल्या झोळीत झोपी घातले. त्यानंतर ती महिला आणि तिचा पती विजय जाधव असे घराबाहेर झोपले होते. दरम्यान, सदर चिमुकला सकाळी घरासमोरील पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत आढळून आला.
कोणीतरी अज्ञात आरोपीने झोळीतील चिमुकल्यास पाण्याच्या टाकीत टाकून त्याचा खून केला असल्याचा संशय पोलीस व्यक्त करत आहेत. याप्रकरणी अंबड पोलिसात अज्ञात आरोपी विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून खून कोणी व का केला याचा पोलीस तपास करत आहेत.
हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जाऊ लागलीत लहान मुलं; कारण वाचून व्हाल हैराण
पुणे जिल्ह्यातही घडली एक भयानक घटना
राज्यात कोरोमानं थैमान घातलं आहे. नागरिकांमध्ये सध्या मोठी भीती पसरली असताना पुणे जिल्ह्यात एक भयानक घटना समोर आली आहे. एका 25 वर्षीय विवाहितेनं मृत्यूला कवटाळलं आहे. आपल्या 3 वर्षांच्या लेकीला कंबरेला बांधून या महिलेनं पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
पुणे जिल्ह्याच्या कोरेगाव भीमा येथे मायलेकीने भीमा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची ही घटना सोमवारी उघडकीस आली. सपना कसबे (रा.सणसवाडी) असं मृत महिलेचं नाव आहे. चिमुरडीचं नाव समजू शकलं नाही.
संपादन - अक्षय शितोळे