उल्हासनगर, 29 डिसेंबर: आपल्या केलेल्या कामाची मजुरी मागणं एका मजुराच्या जीवावर बेतलं आहे. त्याला आपल्या जीवाला मुकावं लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 5 (Ulhasnagar Camp No.5) भागातील लालसाई गार्डन परिसरात मालकानंचं मजुराची निर्घृण हत्या (Murder) केल्याचं स्पष्ट झालं आहे.
बंटी साबळे आणि राहुल घाडगे अशी आरोपींची नावं आहेत. याप्रकरणी उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा...शिवसेनेच्या खासदार भावना गवळींसह 9 जणांविरुद्ध गुन्हा, काय आहे नेमकं प्रकरण?
मनोज हटकर हा रंगकाम करणारा तरुण होता. तो रंगकाम करून आपला आणि कुटुंबाचं पोट भरत होता. मनोज आपल्या कामाची थकीत मजुरी मागण्यासाठी आरोपी बंटी साबळे आणि राहुल घाडगे या दोघांकडे गेला होता. मात्र, मजुरी मागण्यासाठी मनोज हा घरी आल्यानं बंटी आणि राहुलला त्याचा राग आला. त्यामुळे दोघांनीही मनोजला लाथाबुक्क्यांनी काही तास बेदम मारहाण केली. या मारहाणीत मनोजचा जागीच मृत्यू झाला.
गेल्या काही दिवसांपासून बंटी, राहुल आणि मनोज हे मिळेल त्या ठिकाणी रंगकाम करत होते. मात्र, मनोजनं केलेल्या रंगकामाच्या मजुरी पोटी 1200 रुपये बंटी आणि राहुल देणे लागत होते. मनोजची आर्थिक तंगी असल्याने वारंवार पैशांची मागणी तो दोघांकडे करत होता. मात्र बंटी आणि राहुल त्याकडे कायम दुर्लक्ष करत होते.
सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मनोज आपली मजुरी मागण्यासाठी पुन्हा एकदा या दोघांच्या घरी गेला. मात्र, पैसे मागण्यासाठी मनोज थेट घरी आल्यानं त्याचा दोघांना इतका राग आला की त्यांनी मनोजला बेदम मारहाण करीत त्याची हत्याच केली.
हेही वाचा...नव्या कोरोना व्हायरसमुळे गोव्यात खळबळ, 2 जणांची प्रकृती गंभीर
दरम्यान याप्रकरणी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात बंटी आणि राहुल च्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आता पोलीस नक्की मजुरी थकल्याच्या वादातून ही हत्या झाली आहे की याला आणखी काही कारण आहे. याचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांनी दिली आहे. अवघ्या 1200 रुपयाच्या मंजुरीसाठी मनोजला आपल्या जिवाला मुकावे लागल्यानं उल्हासनगरसह परिसरात हळहळ व्यक्त केली जाते.