अमोल गावंडे (प्रतिनिधी)
बुलडाणा, 12 मे- शेगाव शहरात जानोरी रोड वरील रेल्वे गेटजवळ एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मृत तरुणाचे वय साधारण 30 वर्षे आहे. शेगाव ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. मागील आठवड्यातही खामगावला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा खून झाल्याची घटना घडली होती.
राजेश उर्फ गणेश गजानन बोदडे (वय-30) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून तो शेगावच्या मंदिर परिसरात रहात होता. काही वर्षांपूर्वी त्याने क्षुल्लक कारणावरून एका भिकाऱ्याला ठार मारले होते. त्याच्यावर खुनाचा गंभीर गुन्हा देखील झाला होता. नुकताच तो जेलमधून जामिनावर सुटून आला होता. मात्र, आज सकाळी रेल्वेचे काही कर्मचाऱ्यांना जानोरी रेल्वे गेटजवळ एका युवकाचा मृतदेह रस्त्यावर पडलेला आढळून आला. या घटनेची माहिती शेगाव शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.
राजेश हा मागील 3 दिवसांपासून घरून बेपत्ता असल्याचे त्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. मात्र, या हत्येचा गुंता सुटलेला नसून पोलीस त्याच कसून तपास करीत आहेत. तर गेल्या आठवड्यात खामगाव येथे सराईत गुन्हेगार विकी हिवराळे याचा खून झाला होता. ती घटना ताजी असताना गुन्हेगार राजेश बोदडे याचा खून झाला आहे.
VIDEO:राजकारणाच्या मैदानातील 'सामना', मतदानानंतर गौतम गंभीर म्हणतो...