मुंबई, 20 जून- गाडीला साईड न दिल्यावरून झालेल्या वादातून घाटकोपरमध्ये एकाची हत्या करण्यात आली आहे. घाटकोपर येथील साईनाथनगरात बुधवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. गणेश म्हस्के (वय-25) असं मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेली माहिती अशी की, गणेश मध्यरात्री साईनाथ नगर येथील एका छोट्या रस्त्यावरून बाईकने येत होता. याचवेळी समोरून एक कार आली. कारमध्ये चार जण बसले होते. चौघांनी गणेशला त्याची बाईक मागे घेण्यास सांगितले. यावरून त्यांच्यात वाद झाला. नंतर वाद वाढला. चौघांनी गणेशला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याला नाल्यात ढकलून दिले. यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. नंतर आरोपी कार तिथेच सोडून फरार झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गाड्या ताब्यात घेतल्या आहेत.
फिल्म सेटवर अभिनेत्री माही गिलसह दिग्दर्शकाला रॉडने मारहाण
अभिनेत्री माही गिलसह दिग्दर्शकाला रॉडने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (19 जून) मीरा रोड परिसरात घोडबंदर येथे शुटिंगदरम्यान घडली. या मारहाणीत निर्माता साकेत सावनी यांच्यासह काही स्टाफला दुखापत झाली आहे. माही गाडीत गेल्याने तिला किरकोळ दुखापत झाली.
मिळालेली माहिती अशी की, घोडबंदर येथे सेटवर 'फिक्सर' या वेबसीरिजचे शूटिंग सुरु होती. यात माही गिल प्रमुख भूमिकेत आहे. दरम्यान हल्लेखोरांनी सेटवर जाऊन लोखंडी रॉड आणि लाठ्या-काठ्यांनी स्टाफला बेदम मारहाण केली. कोणतीही चर्चा न करता परवानगीशिवाय शूटिंग करता येणार नाही, असे हल्लेखोरांनी सांगितले. यावेळी महिला कलाकारांनाही धक्काबूक्की करण्यात आली. या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. कृष्णा सोनार (वय-34), सोनू विरेंद्र दास (वय-24), सुरज शर्मा (वय-29) अशी आरोपींची नावं आहेत. तिघेही फिल्म सेट लोकेशन मॅनेजर आहेत. चौथा आरोपी रोहित गुप्ता हा फरार आहे. आरोपींवर बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगल घडवणे असे आरोप करण्यात आले आहेत.