दिवा, 10 ऑक्टोबर : रिक्षा लावण्यावरुन झालेल्या वादातून अबोली रिक्षाचालक महिलेला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमित पालेकर (वय 39) याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने सुमित याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक एम.एस.कड यांनी दिली.
दिव्यातील गणेशनगर परिसरात राहणाऱ्या शीतल बनसोडे या रिक्षाचा व्यवसाय करतात. स्टेशन परिसरात रिक्षा स्थानकावर रिक्षा लावण्यावरुन त्यांना वारंवार त्रास दिला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे शीतल बनसोडे या रिक्षा थांब्यावर रिक्षा न लावता बाजूलाच रिक्षा लावून आपला व्यवसाय करतात.
शुक्रवारी सायंकाळी त्यांनी एका वाईन शॉप समोर रिक्षा लावली होती. यावेळी वाईन शॉपमध्ये काम करणाऱ्या सुमित पालेकर यांच्यासोबत त्यांचा वाद झाला. या वादातून शीतल यांना मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी तिघांनी दारु पिऊन मारहाण केल्याचा व जातीवाचक अपशब्द बोलल्याचा आरोप करताना शीतल यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
याविषयी शीतल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या पतीने याबाबत माहिती दिली. शीतल यांना शुक्रवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास तिघांनी जातीवाचक अपशब्द वापरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तिघांनी मारहाण केल्याचा आरोप दाम्पत्य करीत असले तरी यामध्ये केवळ एकाला पोलिसांनी अटक केल्याने पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.