मुंबई , 1 डिसेंबर : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच या अपघातात अनेकांना आपले प्राणसुद्धा गमवावे लागले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने उपाययोजना कराव्यात असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्यामुळे या मार्गावर अपघातांना रोखण्यासाठी परिवहन विभागाकडून दोन्ही महामार्गावर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आज (1 डिसेंबर) पासून 6 महिन्यांसाठी 24 तास सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती जुन्या महामार्गावर जानेवारी 2022 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत 231 अपघात झाले. या अपघातात 160 जन गंभीर जखमी झाले होते तर 92 जनांना प्राण गमवावे लागले होते. तर मुंबई-पुणे नव्या द्रुतगती महामार्गावर जानेवारी 2022 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत 168 अपघात झालेत त्यात 92 जन गंभीर जखमी तर 68 जनांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेत प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
पेन्शनधारकांची चिंता पोस्ट खातं दूर करणार, घरपोच मिळणार मोठी सुविधा
कशी असेल प्रशासनाची?
मुंबई, पुणे, पनवेल, पिंपरी- चिंचवड या प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांमधून 12 पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात 30 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यातील 6 पथके व 15 अधिकारी हे प्रत्येकी या दोन्ही महामार्गावर 24 तास सुरक्षेसाठी असणार आहेत.
काय असतील उपाययोजना
1) परिवहन विभागाकडून तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा यंत्रनेच्या माध्यमातून अपघातग्रस्त ठिकाणांचे सर्वेक्षण करणे व उपाययोजना करणे.
2) अवैधरीत्या रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या वाहनांवर तत्काळ कारवाई करणे.
3) दोन्ही महामार्गावरील टोल नाक्यावर उद्घोषणा करून जनजागृती निर्माण करणे.
4) इंटरसेप्टर वाहनांच्या माध्यमातून अतिवेगाने चालणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे.
5) उजव्या मार्गिकेत कमी वेगाने चालणारी वाहने ट्रक, बस, कंटेनर यांच्या विरुद्ध कारवाई करणे.
6) चुकीच्या पद्धतीने मार्गिका बदलणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे.
7) विना हेल्मेट, विना सीटबेल्ट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करणे.
नियमांचे पालन बंधनकारक
रस्त्यावरील अपघातांची पाहणी आणि अभ्यास केल्यावर समोर आलं की 80 टक्क्यांपेक्षा जास्त अपघात हे चालकांच्या निष्काळजीपणा, बेफिकीर वृत्ती व वाहतूक नियमांचे पालन न करणे यामुळे होतात. रस्त्याचा वापर करणाऱ्या सर्व चालक व नागरिक यांनी नियमांचे पालन करावे जेणे करून त्यांना प्राण गमवावे लागणार नाही, असे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.