मुंबई, 01 डिसेंबर : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या ना त्या प्रकरणामुळे कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा राणा दाम्पत्याच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची चिन्ह आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण प्रकरणात राणा दाम्पत्यांविरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी दोघांना अटक झाली होती.
(राष्ट्रवादीने जातीच्या राजकारणासाठी वापरलं शिवरायांचं नाव, राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा)
त्यानंतर त्यांना जामीन सुद्धा मिळाला होता. पण नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा आहे. या प्रकरणात राणा दाम्पत्यांविरोधात मुंबई सत्र न्यायालयानं वॉरंट जारी केलं आहे. न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी जारी केलेलं हे वॉरंट बेलेबल असलं तरी येत्या 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी जर दोघेही गैरहजर राहिले तर त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी होऊ शकतं.
काय आहे प्रकरण?
(माझ्यामुळे जर भाजपची अडचण होत असेल तर.., उदयनराजे संतापून स्पष्टच बोलले)
शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार करत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा अमरावतीहून मुंबईत आले. त्यानंतर झालेल्या संघर्षानंतर राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी अटक केली. राणा दाम्पत्याच्या विरोधात राजद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आला. 24 एप्रिलपासून राणा दाम्पत्य हे न्यायालयीन कोठडीत असून त्यांनी केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण या सुनावणीत निकाल जाहीर करण्यात आला नव्हता तो राखीव ठेवला होता. त्यानंतर तीन दिवसांनी राणा दाम्पत्यांना सशर्त जामीन मिळाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.