मुंबई 08 मार्च : संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होऊ द्या आणि ते कामावर आल्यावर त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश देणारं एसटी महामंडळाचं एक गोपनीय पत्रं उघड झालं आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. मात्र व्हायरल होणारं हे पत्र खोटं असल्याचं एसटी महामंडळाने म्हटलं आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी मात्र या पत्राची होळी केली. अशात आता पोलिसांनी पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना ताब्यात घेतलं आहे.
व्हायरल होणाऱ्या या पत्राविरोधात पडळकर आणि खोत यांनी आवाज उठवला आहे. माधव काळे हे एसटी महामंडळातील वाझे असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. माधव काळे हा कोणाची वसूली करतात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. हे सरकार दुटप्पी असून त्यांना कामगारांचा छळ करून एसटीमध्ये पैसे घेऊन त्यांच्या लोकांना भरती करायचं आहे. अधिवेशनात आम्ही याविरोधात आवाज उठवणार आहोत, असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.
हे पत्रं चुकीचं असल्याचं एसटी महामंडळाकडून सांगण्यात येत आहे. मात्र हे खोटं असल्याचं पडळकर म्हणाले. ते म्हणाले, की हे गोपनीय पत्रं आहे. ते बाहेर पडणार नाही असं त्यांना वाटत होतं. मात्र ते बाहेर आलं. त्यामुळं आता अधिकारी उघडे पडले आहेत. चुकीचं पत्रक आहे तर ते बाहेर कसं आलं. संबंधितांवर कारवाई का केली नाही? असा सवालही पडळकरांनी उपस्थित केला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gopichand padalkar, Sadabhau khot