मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

स्वातंत्र्यदिनाआधी 27 दिवस 700 लोकांना जलसमाधी; मुंबईच्या Titanic ला 75 वर्षं

स्वातंत्र्यदिनाआधी 27 दिवस 700 लोकांना जलसमाधी; मुंबईच्या Titanic ला 75 वर्षं

टायटॅनिकची गोष्ट माहिती असलेल्या आजच्या पिढीला मुंबईजवळची रामदास बोट दुर्घटना माहिती असणे अवघड आहे? आजपासून 75 वर्षांपूर्वी मुंबईच्या समुद्रात अशी एक घटना घडली ज्याने देशभरात खळबळ उडाली होती.

टायटॅनिकची गोष्ट माहिती असलेल्या आजच्या पिढीला मुंबईजवळची रामदास बोट दुर्घटना माहिती असणे अवघड आहे? आजपासून 75 वर्षांपूर्वी मुंबईच्या समुद्रात अशी एक घटना घडली ज्याने देशभरात खळबळ उडाली होती.

टायटॅनिकची गोष्ट माहिती असलेल्या आजच्या पिढीला मुंबईजवळची रामदास बोट दुर्घटना माहिती असणे अवघड आहे? आजपासून 75 वर्षांपूर्वी मुंबईच्या समुद्रात अशी एक घटना घडली ज्याने देशभरात खळबळ उडाली होती.

  • Published by:  Rahul Punde
मुंबई, 13 ऑगस्ट : कधीही न बुडणारे जहाज म्हणून ज्याचा जगभर गवगवा झाला होता. ते प्रसिद्ध टायटॅनिक जहाज आपल्या पहिल्याच प्रवासात बुडाले होते. ही गोष्टी बहुतांशा लोकांना माहिती आहे. या घटनेवर आधारित टायटॅनिक नावाचा चित्रपटही आला होता. त्यामुळे याची ख्याती जगभर पोहचली. पण, टायटॅनिकची गोष्ट माहिती असलेल्या आजच्या पिढीला मुंबईजवळची रामदास बोट दुर्घटना माहिती नसेल? हो, आजपासून 75 वर्षांपूर्वी मुंबईच्या भाऊच्या धक्क्याहून निघालेली रामदास बोट बुडाली. टायटॅनिक अपघाताच्या निम्मे प्रवासी या अपघातात मृत्युमुखी पडले. त्या घटनेला आज 75 वर्षे होत आहेत. काय होती घटना? 75 वर्षांपूर्वी, गुरुवारी 17 जुलै 1947 रोजी भाऊच्या धक्क्यावरून रेवसला जाण्यास निघालेली 'रामदास' बोट अवघ्या नऊ मैलांच्या अंतरावर 'काशा'च्या खडकाजवळ वादळात सापडून, एका भयंकर मोठ्या लाटेचा तडाखा बसून समुद्रात बुडाली. बोटीवर लहानमोठी मुलेबाळे धरून सुमारे एक हजार तरी प्रवासी असावेत, असा लोकांचा अंदाज आहे. त्यापैकी अवघे 232 प्रवासी मोठ्या प्रयत्नाने वाचले. बोटीचा कप्तानही वाचला आहे. या प्रकारामुळे मुंबई, ठाणे, कुलाबा आणि रत्नागिरी जिल्ह्यांची सारी कोकणपट्टी हादरली होती. कशी घडली? मुंबईहून रेवसकडे जाण्यास निघालेली 'रामदास' बोट 17 जुलै रोजी मुंबई बंदरापासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या 'काशा'च्या खडकाजवळ सोसाट्याचा वारा आणि लाटांच्या तडाख्यात अडकली. कप्तानने बोट सांभळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, बोट समुद्रात बुडाली आणि तिच्याबरोबर त्या बोटीने प्रवास करणारे सहा-सातशे प्रवाश्यांना जलसमाधी मिळाली. ही घटना इतकी भीषण होती, त्यांच्यापर्यंत कोणतीच मदत पोहचू शकत नव्हती. सर्वांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली. मुंबईचे मुख्य प्रधान बाळासाहेब खेर, मुरारजी देसाई, तपासे यांनीही पूर्ण चौकशीचे आश्वासन दिले होते.

वाचा - India@75 : 75 वर्षांपूर्वी जुनी दिल्ली एका रात्रीत कशी झाली रिकामी?

रामदास बोट.. रामदास बोट एका प्रसिद्ध कंपनीने बांधली होती. स्कॉटलंडच्या ज्या स्वान अँड हंटर कंपनीने 'क्वीन एलिझाबेथ' ही आलिशान बोट बांधली होती. त्याच कारखान्याने 179 फूट लांब आणि 29 फूट रुंद, 1000 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेली अशी देखणी 'रामदास' बोट 1936 मध्ये बांधली. काही वर्षांनी तिची मालकी इंडियन कोऑपरेटिव्ह स्टीम नेव्हिगेशन कंपनीकडे आली. देशात ज्यावेळी स्वदेशीच्या चळवळी जोर धरू लागल्या होत्या, त्यावेळी काही स्वाभिमानी देशभक्तांनी, देशाभिमानाच्या भावनेतून सहकाराच्या तत्त्वावर इंडियन कोऑपरेटिव्ह स्टीम नेव्हिगेशन कंपनी काढली. सन 1942 मध्ये ती युद्धकार्यासाठी सरकारने घेतली होती. प्रवासाच्या एका तासाच्या आत जलसमाधी 17 जुलैला सकाळी आठ वाजता रामदास बोट भाऊच्या धक्क्यावरून रेवसला जाण्यास निघाली. रामदास मुंबईच्या बंदरापासून समुद्रात 13 किलोमीटरपर्यंत गेली असेल तोच लाटांचा, पावसाचा आणि वादळाचा जोर वाढला. डेकवर पाणी साचू लागलं. गप्पा मारणाऱ्या लोकांमध्ये एका क्षणाची शांतता जाणवली. बोट एका बाजूला कलंडून पाणी आत शिरलं आणि बोटीतले सगळे ओरडू लागले. बोटीवर असणाऱ्या तुटपुंज्या लाईफ सेव्हिंग जॅकेटसाठी सगळे धडपडू लागले. कॅप्टन शेख सुलेमान आणि चीफ ऑफिसर आदमभाई सगळ्यांना ओरडून शांत राहाण्याचे सुचवत होते, पण त्यांच्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. जे पाहू शकत होते त्यांनी बोट एक बाजूला कलंडलेली पाहिली आणि समुद्रात उड्या मारल्या. काहींनी लाईफ जॅकेट मिळवून बोट सोडली. बोटीवर हाहाकार होता. प्रवासाच्या एका तासाच्या आत बोट बुडाली. त्या दिवशी समुद्रावर वादळ होते, असे एका वाचलेल्या प्रवाशाने सांगितले. 'वादळाचा जोर पाहून आसऱ्यासाठी जवळच्याच खाडीत बोट घालण्याचा प्रयत्न कप्तान शेख सुलेमान यांनी केला, तेव्हा एखाद्या कचकड्याच्या खेळण्याप्रमाणे बोट लाटांवर हेलकावे खात होती. अखेर सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले अन् बोटीला जलसमाधी मिळाली. अन् सगळीकडे शोककळ पसरली ही भयंकर बातमी सायंकाळी चारच्या सुमारास मुंबईला समजली. अवघ्या नऊ मैलांवरचा हा भीषण प्रकार मुंबईकरांना संध्याकाळी समजला. बंदरावरील बोट कंपनीलाही त्याची माहिती उशीरा समजली. सकाळी सुटलेली रामदास बोट वास्तविक दुपारी दोन वाजता मुंबई बंदरात परत यायची. पण, तिचा एवढा वेळ पत्ता न लागल्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. बोट बुडाल्याची बातमी त्यांना संध्याकाळी चार वाजता समजली. मुंबई शहरात ती बातमी संध्याकाळी वादळाच्या वेगाने पसरली आणि जनतेमध्ये हाहा:कार उडाला. ज्यांचे नातेवाईक त्या दिवशी सकाळच्या बोटीने अमावास्या साजरी करण्यासाठी गावाला गेले होते, ते त्यांच्या काळजीने वेडेपिसे झाले. लोकांच्या झुंडीच्या झुंडी ठिकठिकाणच्या आगबोट कंपनीच्या तिकिटविक्रीच्या ऑफिसवर चौकशी करण्यासाठी जाऊ लागल्या. 20 लोकांना वाचवण्यात यश.. बोट बुडाल्याची बातमी उरणला दीड वाजता समजली. करंजे बंदरात पोहत आलेल्या लोकांकडून हकीकतही समजली. लगेच लोक मोटारी, टांगे वगैरे घेऊन मदतीसाठी करंजे, मोरे, पिरवाड येथील बंदरकिनारी गेले. त्यांना काही माणसे समुद्रात तरंगत असलेली दिसताच, धाडसी मंडळींनी आपल्या जिवाची पर्वा न करता समुद्रात उड्या टाकल्या. त्यांनी वीस लोकांना जिवंत बाहेर काढले. पैकी करंजे बंदरात 12 व पिरवाड येथे आठ असे लोक वाचविण्यात आले.
First published:

Tags: Mumbai

पुढील बातम्या