मुंबई, 12 मार्च : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काही दिवसांपूर्वी पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकत एक स्टिंग ऑपरेशन समोर आणले होते. या स्टिंग ऑपरेशनमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर (MVA Government) निशाणा साधला आहे. पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांच्या बदली घोटाळ्याच्या संदर्भातील माहिती मी केंद्रीय गृहसचिवांना दिली आहे त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुंबई पोलिसांनी मला नोटीस पाठवली - देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील अधिकाऱ्यांचा बदली घोटाळा मी उघडकीस आणला होता. दिल्लीत केंद्रीय गृहसचिव यांना मी सगळी माहिती सादर केली. कोर्टानं त्याचं गांभीर्य ओळखून CBI ला चौकशी करण्याचे आदेश दिले. ऑफिशियल सीक्रेट माहिती लीक कशी झाली याचा FIR महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केला. ऑफिशिअल सीक्रेट अॅक्ट नुसार राज्य सरकारने गुन्हा दाखल केला आहे. मला पोलिसांनी नोटीस पाठवून प्रश्न विचारले. विरोधी पक्षनेते म्हणून मला माहितीचा स्त्रोत विचारला जाऊ शकत नाही. मला काल CRPC नोटीस मुंबई पोलिसांनी पाठवली. उद्या 11 वाजता BKC सायबर ठाण्यात बोलावलं आहे.
पोलीस चौकशीला सामोरं जाणार
ही सगळी माहिती मी भारत सरकार गृहसचिवांनी दिली आहे. ही माहिती मी बाहेर कुठे बोललो नाही. पण राज्यातील मंत्र्यांनी ही माहिती बाहेर दिली. माझ्याकडे पुरावे आहेत. माझ्या माहितीचा स्त्रोत सांगणं मला बंधनकारक नाहीये. पोलिसांनी चुकीची केस केली असली तरी मी जाणार, पोलिसांना सहकार्य करणार आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हा अहवाल 6 महिने सरकारकडे पडला होता, त्यावर कुठलीही कारवाई सरकारने केली नाही. मग सरकारवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांनी घोटाळा बाहेर काढला त्यांच्यावर ? हा माझा सवाल आहे. राज्य सरकार नं केलेल्या षड्यंत्रचा भांडाफोड मी परवा केला म्हणून काही सुचत नसल्यानं त्यांनी मला ही नोटीस दिली असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
CRPC 160 ची नोटीस आहे. बदली घोटाळा मी उघडकीस आणला, त्यासंदर्भात नोटीस आहे. मी गृहमंत्री होतो, पण मी पोलिसांना तपासात सहकार्य करणार, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणार. या संदर्भात सीबीआय चौकशी सुरू असून तपासात सत्य समोर येणार असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नवाब मलिकांचा राजीनामा घेतला नसल्याची खंत
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज 12 मार्च आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की, मुंबईचा बॉम्बस्फोट हा 12 मार्च रोजी झाला होता. आता 3 दशकं झाली तरी त्याचे आपल्या मनावर घाव कायम आहेत. 12 मार्च 1993च्या बॉम्बस्फोटात शहीद झालेल्या सर्व मुंबईकरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत व्यवहार करणारे जेलमध्ये जाऊनही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कायम आहेत याबाबत मी खंत व्यक्त करतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Devendra Fadnavis