मुंबई, 15 मार्च : राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. प्रविण दरेकर यांनी मुंबै बँक (Mumbai Bank) निवडणुकीसाठी मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दाखल केला आहे. यापूर्वीही दरेकर मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच मुंबै बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्या प्रकरणी आम आदमी पक्षाने आक्षेप घेत पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर आता प्रवीण दरेकर यांच्या मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pravin Darekar in trouble as case registered against him)
या प्रकरणी दोन महिन्यांपूर्वी आम आदमी पक्षाने तक्रार केली होती. माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. सहकार विभागाचे सह निबंधक बाजीराव शिंदे यांनी मजूर म्हणून प्रवीण दरेकर याना अपात्र घोषित केले. त्यानंतर त्यांचा जबाब ही पोलिसांनी नोंदवला तसेच सर्व कागदपत्रे सहकार विभागाने देऊनही पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते. याबाबत आम आदमी पक्षाच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे गुन्हा दाखल व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला. शेवटी आम्ही जनआंदोलन करण्याची तयारी सुरु केली तेव्हा आज दोन महिन्यांनी मुंबै बँकेच्या बोगस व बनावट मजुरावर गुन्हा दाखल झाला असं आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी म्हटलं आहे.
वाचा : जलयुक्त शिवार योजना घोटाळ्यात मोठी कारवाई, दोन कृषी सहाय्यकांसह चौघांना अटक
सहकार विभागाने बजावली होती नोटीस
प्रविण दरेकर यांनी मुंबै बँक निवडणुकीसाठी मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दाखल केला होता. यापूर्वीही दरेकर मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच मुंबै बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. आताही त्यांनी प्रतिज्ञा मंजूर संस्थेमार्फत मुंबै बँक निवडणुकीसाठी अर्ज भरला. मात्र दरेकर मजुर नसल्याचा आक्षेप घेत त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने दरेकर यांना सहकार विभागाने नोटीस बजावली होती. या नोटिशीत आपण मजूर आहात की नाही? अशी विचारणा दरेकर यांना करण्यात आली होती. तसेच दरेकर यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता 2 कोटी 9 लाख रुपये असल्याचे दाखवले होते. दुसरीकडे विरोधी पक्षनेते म्हणून दरेकर यांना 2 लाख 50 हजार मानधन मिळत आहे. त्यामुळे आपण प्रथमदर्शनी मजूर असल्याचे दिसून येत नसल्याचेही नोटिशीत नमुद करण्यात आले होते.
प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया
या प्रकरणी प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, सुडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांवर दबाव आणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश महाजन यांच्या विरोधात जसं षडयंत्र रचण्यात येत होतं तशाच प्रकारे माझ्या विरोधात गुन्हा दाखल करुन अडकवून दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कसा आणि कशाच्या आधारे गुन्हा दाखल केला हे माहिती नाही. पण कायदेशीर प्रक्रियेने न्यायालयात याला उत्तर देऊ.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Mumbai, Pravin darekar