मुंबई, 04 सप्टेंबर : सलग दोन दिवस शनिवार रविवारी सुट्टी आल्याने मुंबईतील सर्वच मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी शनिवारी दिवसभर भक्तांची रिघ लागली मात्र जोरदार पावसाने गणेश भक्तांची मात्र पावसामुळे दैना उडाली. (Mumbai Rain Update) परेल ते भायखळा या मार्गावर दुतर्फा एकच गर्दी झालेली पहायला मिळाली मात्र या भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान वाहतूक पोलीस अधिकारी, कर्मचारी सेवा बजावल्याने अनेक अडचणी दूर झाल्याचे दिसून आले.
मुंबई शहर व उपनगरात रात्री अकरा वाजल्यापासून पावसाची रिपरीप सुरू झाली असून काही भागात पावसाच्या मुसळधार सरी पडल्या. मध्यरात्री 12 वाजेपर्यंत तासाभरात चेंबूरमध्ये सर्वाधिक 32 मीमी पावसाची नोंद झाली. घाटकोपर परिसरात तासाभरात 23 मिमी तर कुर्ला येथे 30 मिमी पावसाची नोंद झाली. रावळी कॅम्प 21 मिमी, नायर हॉस्पिटल 11 मिमी पावसाची नोंद झाली. विक्रोळी येथे 11 मिमी तर विलेपार्ले येथे 8 मिमी पावसाची नोंद झाली.
हे ही वाचा : Belly Fat Prevention : रोजच्या सवयींमध्ये करा हे छोटे बदल, कधीच वाढणार नाही बेली फॅट
लालबाग येथील मुंबईच राजाचे दर्शन घेण्यासाठी तुडूंब गर्द होती. दर्शन घेण्यासाठी आलेले कुटुंबीय बाप्पासोबत सेल्फी घेण्याचा आनंद लुटत होते. हा मार्ग गणेश भक्तांनी गजबजला होता. त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरु होती. गौरी पूजनाच्या दिवशी पहाटेपासूनच मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली आहे. काही भागांत वीजांचा कडक़डाटही अनुभवायला मिळत आहे. एकाएकी आलेल्या पावसामुळं मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली आहे. गणेशोत्सवाची धूम पाहण्यासाठी मुंबईत आलेल्या अनेक गणेश भक्तांनाही पावसानं पेचात पाडल्याचं पाहायला मिळत आहे.
काही भागात वाहतुकीवर परिणाम
मुंबईत झालेल्या पावसामुळं काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. कुर्ला-अंधेरी रोडवरील काजूपारा इथेही रस्त्यावर पाणी साचले होते. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. वाहतूक संथ गतीनं सुरु होती. मुंबईतील कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, सायन परिसरात काही वेळ जोरदार पाऊस झाला. मुंबईसह राज्यातील इतरही काही भागात पावसानं हजेरी लावली आहे.
हे ही वाचा : लाईफ@25 : 22 व्या वर्षीच IPS, केरळमध्ये नाव गाजवतेय महाराष्ट्राची कन्या ऐश्वर्या
औरंगाबाद जिल्ह्यातही काल दुपारपासून अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. तसेच जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानं झाडे उन्मळून पडली आहेत. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर, नाशिकचा घाट भाग, अहमदनगर, रायगड या जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Monsoon, Mumbai rain, Pune rain, Weather forecast, Weather update, Weather warnings