मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

इतिहासातील BMC : 235 फुट उंच, बांधकामाला लागले तब्बल 4 वर्ष, काय आहे BMC च्या भव्य दिव्य इमारतीचा इतिहास?

इतिहासातील BMC : 235 फुट उंच, बांधकामाला लागले तब्बल 4 वर्ष, काय आहे BMC च्या भव्य दिव्य इमारतीचा इतिहास?

बीएमसी इमारत

बीएमसी इमारत

ही सर्वांगसुंदर व भव्य अशी इमारत गॉथिक वास्तूशास्त्र पद्धतीने बांधलेली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Khushalkant Dusane

मुंबई, 27 नोव्हेंबर : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबईला ओळखले जाते. तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. दरम्यान, आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होणार आहे. या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. त्यामुळे मुंबई मनपात सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक जोरदार तयारीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमत विशेष लेख मालिका सुरुवात केली आहे.

मुंबई महापालिकेची इमारत देशातील अनेक जुन्या इमारतींपैकी एक मानली जाते. ही इमारत जागतिक वारसा यादीत येते. मग या भव्य आणि दिव्य इमारतीचा इतिहास नेमका काय आहे, ही इमारत नेमकी कशी तयार झाली, याबाबत जाणून घेऊयात.

मुंबई मनपाची स्थापना ही 1889 मध्ये झाली. याआधी मुंबईत अशी यंत्रणा नव्हती. सन 1668 पासून मुंबईवर ताबा मिळवल्यानंतर जवळपास दोनशे वर्ष येथील कारभार ब्रिटिश गव्हर्नर आणि त्याच्या सचिवामार्फत चालवला गेला. या कालावधीत लोकसंख्या वाढीबरोबर कायदा आणि सुव्यवस्था आणि जनतेच्या आरोग्याचे प्रश्न वाढू लागले होते. म्हणूनच हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी संस्थेची गरज भासू लागली. म्हणून मुंबई महापालिका बनण्यासाठी हे पहिलं पाऊल पडले, असे ‘ऐक मुंबई तुझी कहाणी’ या पुस्तकात मुंबई महापालिकेचा इतिहासाबाबत सांगितले आहे.

महापालिका इमारत गॉथिक शैलीतील असून ती चार मजली आहे. दगडी कामातून ही इमारत तयार झाली आहे. या इमारतीच्या बाजूलाच पालिकेची सहा मजली विस्तारीत इमारत आहे. महापालिकेत पालिका आयुक्त, महापौर, चार अतिरिक्त आयुक्त, गटनेते, विरोधी पक्षनेते, विविध समित्यांचे अध्यक्ष आणि विविध खात्यांची दालने आहेत. तसेच महापालिका सभागृह हे या इमारतीचं मुख्य आकर्षण आहे. पालिका सभागृहात विविध महापुरुषांचे पुतळे ठेवण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेची इमारत 31 जुलै 1893 मध्ये उभारण्यात आली. या इमारतीच्या बांधकामाला 25 एप्रिल 1889मध्ये सुरुवात झाली होती. गॉथिक वास्तुकलेनुसार ही इमारत बांधली आहे. फेड्रिक विल्यम स्टिव्हन्स या वास्तू शिल्पकारांने या इमारतीला पौर्वात्य वास्तूशिल्पाची जोड देऊन या इमारतीला आगळंवेगळं रुप दिलं आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळ त्रिकोणी आकाराच्या जागेत 6600.65 चौरस वार जमिनीवर तत्कालीन सहायक अभियंता रावसाहेब सीताराम खंडेराव यांच्या देखरेखीखाली ही इमारत उभारण्यात आली आहे. जमिनीपासून या इमारतीच्या सर्वोच्च टोकापर्यंतची उंची 235 फूट आहे. या अतिभव्य आणि देखण्या इमारतीचा जागतिक वारसा यादीतही समावेश करण्यात आलेला आहे.

हेही वाचा - इतिहासातील BMC : कुणी डॉक्टर, वकील तर कुणी परिचारिका, 'या' महिलांनी गाजवलं मुंबईचं महापौरपद

भारतातील अग्रगण्य शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगराचे प्रतिनिधीत्व या इमारतीचा 235 फूट उंचीचा मनोरा करीत आहे. फेड्रिक विल्यम स्टिव्हन्स या नामवंत वास्तुशिल्पकाराकडून मुख्यालय इमारतीचे संकल्पनाचित्र व आराखडे तयार करण्यात आले. तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासाच्या दृष्टिने महत्त्वाचे कायदे बनविणारे तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड रिपन यांनी त्यावेळी इमारतीची कोनशिला बसवली.

बांधकाम कधी झाले -

25 एप्रिल 1889 रोजी बांधकामास प्रारंभ झाला होता. तर 31 जुलै 1893 रोजी या भव्यदिव्य इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. तसेच 16 जानेवारी 1893 रोजी प्रत्यक्ष कामकाजास प्रारंभ झाला. तत्कालीन मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मिळालेल्या 6600.65 चौरस वार जमिनीवर ही इमारत बांधण्यात आली. रावसाहेब सीताराम खंडेराव यांच्या देखरेखीखाली बांधकाम पूर्ण झाले. तर ठेकेदार व्यंकू बाळाजी कालेवार यांनी अपेक्षित कालावधीत काम पूर्ण केले.

ही सर्वांगसुंदर व भव्य अशी इमारत गॉथिक वास्तूशास्त्र पद्धतीने बांधलेली आहे. त्यात पौर्वात्य व पाश्चात्त्य स्थापत्य कलेचा मनोहारी संगम आहे. ठिकठिकाणी त्याचा प्रत्यय येतो. इमारत बांधकामाचा खर्च रुपये 11 लाख 19 हजार 969 इतका झाला. मूळ अंदाजित खर्च रुपये 11 लाख 88 हजार 092 रुपयांच्या तुलनेत 68 हजार 113 रुपये इतका कमी खर्च झाला. बांधकाम पूर्ण करुन शिल्लक रक्कम सरकारजमा करण्यात आली.

इमारतीचे मूळ स्वरुप आजही कायम आहे. अंतर्गत रचना बदलताना मूळ स्वरुपाला कोणताही धक्का न लावता प्रयत्नपूर्वक या इमारतीचे बांधकाम व सौंदर्य जपण्यात येत आहे. मुख्यालयात सुमारे 68 फूट लांब, 32 फूट रुंद, 38 फूट उंचीचे ऐतिहासिक सभागृह हे आकर्षणाचा भाग. सभागृहात दोन प्रेक्षक दालनांचाही समावेश. तसेच तीन मोठी झुंबरही आहेत.

सुमारे तीन दशकांपेक्षा जास्त काळ मुंबई महानगरपालिकेत नागरी हक्कांसाठी झगडत मुंबई महानगराच्या विकासाला दिशा देणारे असे सर फिरोजशहा मेहता यांचा पुतळा दिनांक 23 एप्रिल 1923 रोजी महानगरपालिका मुख्यालयासमोर स्थापन करण्यात आला.

First published:

Tags: BMC, Election, Mumbai