मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /तुमच्या घरगड्यांना त्रास होतोय म्हणून तुम्ही ED ला घरगडी म्हणता का? देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

तुमच्या घरगड्यांना त्रास होतोय म्हणून तुम्ही ED ला घरगडी म्हणता का? देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

(फाईल फोटो)

(फाईल फोटो)

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बोलताना विरोधकांना टोले लगावले. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना रोखठोक सवाल केले आहेत.

तुषार रूपनवर, प्रतिनिधी

मुंबई, 25 मार्च : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज विधानसभेत जोरदार भाषण करत विरोधकांच्या आरोपांना सणसणीत उत्तरं दिली. तसेच अनेक शालजोडीतील फटकारेही हाणले. मुख्यमंत्र्यांच्या या तुफान भाषणानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुद्धा भाषण केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी जे विषय मांडले, त्यापैकी एकाही बाबतीत उत्तर आले नाही. घोटाळे, राणीची बाग, सॉल्ट पॅनच्या जागेवर पार्क, आरोग्य खरेदी यापैकी कशावरच उत्तर नाही. सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. युक्रेनचे अध्यक्ष नाटोकडे मदत मागत आहेत. पण त्यांनी नाटोकडे मदत मागण्याऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत मागायला हवी होती. तर जास्त बरं झालं असतं. कारण आमच्या मुख्यमंत्र्यांकडे असं एक शस्त्र आहे, एक असा बॉम्ब आहे जो सर्वांवर भारी आहे. तो बॉम्ब म्हणजे टोमणे बॉम्ब. टोमण्यांच्या शिवाय इतर काय आहे.

मराठी शाळा बंद झाल्या त्यावर बोलले नाही. 386 कोटी रुपये बंद शाळांवर सफाईसाठी खर्च झाले यावर बोलले नाही. कोरोना काळात सर्वाधिक मृत्यू झाले यावर बोलले नाही. खरं तर मला मनातून दु:ख आहे की, नवाब मलिकांचं समर्थन इतर कुणी केलं असतं तर ठिक आहे पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. कधी-कधी असं होतं, सत्ता चालवण्यासाठी मनात नसलेल्या गोष्टींचं समर्थन होतं असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या जखमेवर मीठ, सकाळच्या शपथविधीवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला टोला

नवाब मलिक यांनी बॉम्ब स्फोटातील आरोपीकडून जमीन खरेदी करणं आणि दाऊदच्या माणसाकडून जमीन खरेदी करणं. जो जेममध्ये आहे बॉम्ब स्फोटातील आरोपी त्याच्याकडून खोट्या कागदपत्रांवर जमीन खरेदी करणं आणि त्याचं समर्थन कसं होऊ शकतं? अशा गोष्टीचं समर्थन करतात या गोष्टीचं मला अतिशय दु:ख आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आम्ही पारदर्शी कारभार केला त्यामुळे आरशासमोर उभे राहू शकतो. ईडी म्हणजे घरगडी असे तुम्ही म्हणत आहात. तुम्ही असे म्हणत आहात कारण, तुमचे घरगडी आहेत त्यांना ईडी बोलवतेय? असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला. उद्या आम्ही मुंबई पोलिसांना घरगडी बोलायचं का? केला ना तुम्ही दरेकरांवर एफआयआर.

वाचा : 'सत्ता पाहिजे ना, मी येतो तुमच्या सोबत पण...' मुख्यमंत्र्यांची भाजपला थेट ऑफर

हे तर कुणीच घोषित करु नये की, उद्या कोण, परवा कोण? पण ही अक्कल तुम्ही संजय राऊत यांना देणार आहात का? केलं ना त्यांनी घोषित, ते बोलतात ना बाप-बेटा जाणार त्यांच्याविषयी काय बोलणार असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, मी टीकेला आणि बदनामीला घाबरत नाही. मी कसा आहे हे सगळ्यांना माहित आहे. नवाब मलिकांवर तथ्यहीन आरोप. केंद्रीय संस्था एवढ्या पोकळ झाल्या का? की नवाब मलिक हे दाऊद हस्तक असतांना सगळीकडे वावरत असतांना सातत्याने निवडून येत असतांना तोपर्यंत या यंत्रणांना काहीच कळलं नाही? केंद्रीय यंत्रणा मग त्या काळात काय करत होती, दिवे लावत होती का, की थाळ्या वाजवत होती? बाण लक्ष्यवेध करणारे हवेत, पण आता  हे बाण हातात धरून खुपसले जात आहेत. ईडीएवढी बेकार का, की ते तुम्ही दिलेल्या माहितीवर चौकशी करत आहे. ती ईडी की घरगडी हे काहीच कळत नाहीये.

First published:

Tags: Devendra Fadnavis, Mumbai, Uddhav thackeray