मुंबई, 27 जानेवारी : गेल्या अनेक दिवसांपासून तब्येतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे शासकीय कार्यक्रमात ऑनलाईन माध्यमातून उपस्थित राहत होते. मात्र, 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाला ध्वजारोहण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) सुद्धा उपस्थित होत्या. पण आता या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
प्रजासत्ताक दिनाचे फोटोज सोशल मीडियात शेअर करण्यात आले आहेत. या फोटोजवरुन अॅड जयश्री पाटील यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमान झाला असल्याचं जयश्री पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
वाचा : हा आहे खराखुरा 'बजरंगी भाईजान', आतापर्यंत 600 हून अधिक बेपत्ता मुलांना पोहोचवलं घरी
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे सुद्धा उपस्थित होत्या. या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे फोटोज समोर आले आहेत. त्यात रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शेजारी उपस्थित आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे तिरंग्याला सलाम करताना दिसून येत आहेत तर रश्मी ठाकरे केवळ स्तब्ध उभ्या असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे.
भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिन निमित्ताने #वर्षा निवासस्थानाच्या प्रांगणात मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री @AUThackeray, मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती आदी उपस्थित होते.#प्रजासत्ताकदिन#RepublicDay pic.twitter.com/XI9oJSL21H
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 26, 2022
रश्मी ठाकरे यांनी झेंडावंदन झाल्यावर तिरंग्याला सलामी दिली नाही आमि त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झाला आहे. असं सांगत जयश्री पाटील यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे अॅड जयश्री पाटील यांनी तक्रार केली आहे. तसेच चौकशी करुन रश्मी ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आपल्या तक्रारीत अॅड जयश्री पाटील यांनी म्हटलं, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी रेड कार्पेटवर ध्वजारोहन करणारे उपस्थित असतात. यावेळी झेंडावंदन झाल्यावर सलामी द्यायची असते. पण मुख्यमंत्र्यांच्या पत्नी या रेड कार्पेटवर उभ्या राहून ध्वजारोहणाला सलामी देत नाहीयेत. त्यामुळे हे ध्वजसंहितेचा अपमान करणे हे हिंदुस्थानी भारतीय नागरिकांचा सार्वजनिकरित्या भावनांचा अपमान केल्यासारखे आहे. त्यांच्याकडून अक्षम्य अपराध झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Republic Day, Uddhav thackeray, महाराष्ट्र