मुंबई 16 ऑगस्ट : प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (mukesh ambani) यांना स्वातंत्र्यादिनाच्या दिवशीच फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटल येथे ७ ते ८ वेळा फोन करून अफजल असं नाव सांगत या व्यक्तीने धमकी दिली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणी एका संशयित व्यक्तीला बोरिवलीतून ताब्यात घेतलं. आता या व्यक्तीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
डी बी मार्ग पोलिसांची मागणी कोर्टानं मान्य केली केली आहे. 20 ऑगस्ट रोजी त्याला कोर्टात पुन्हा हजर केलं जाणार आहे. बिष्णू भौमिक असं या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरकारी वकीलांनी आपला युक्तिवाद मांडताना म्हटलं, की देश स्वतंत्र झाला याच दिवशी या व्यक्तीने फोन का केला ? मोठ्या व्यक्तीच्या नावानं धमकी देण्याचं शहाणपण त्याला कुठून आलं ? यामागे आरोपीचं निश्चित धोरण होतं का? असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले.
अंबानींना धमकी देण्यासाठी 8 वेळा केला कॉल; वारंवार ही 2 वाक्यं बोलत होता 'अफजल'
मुकेश अंबानी यांना धमकी देण्याची मानसिकता ही देशासाठी गंभीर बाब आहे. आरोपीने यापूर्वीही अशी कृत्य केली आहेत, त्यामुळे ही गंभीर बाब आहे. या सर्वाची चौकशी करण्यासाठी आरोपीची 10 दिवस पोलीस कोठडी द्यावी ही मागणी वकिलांनी केली होती.
का मागितली पोलीस कोठडी -
- घटनेमागील कारण शोधण्यासाठी
- तांत्रिक डेटा जमा करण्यासाठी
- आवाज नमुना घेण्यासाठी
- अजून कोण साथीदार आहे का? हे तपासण्यासाठी
- या व्यक्तीची अशी मानसिकता का झाली? याचा तपास करण्यासाठी
कोण आहे विष्णू भौमिक -
मिळालेल्या माहितीनुसार, बिष्णू हा मानसिकरित्या अस्थिर आहे. पूर्वी झवेरी बाजार भागात बिष्णू भौमिकचा ज्वेलरी व्यवसाय होता. 13 जुलै 2011 च्या झवेरी बाजार ब्लास्टमध्ये बिष्णूच्या दुकानाचं मोठं नुकसान झालं होतं. तेव्हापासूनच बिष्णू मानसिकरित्या अस्थिर झाल्याची माहिती समोर आली आहे. हे दुकान त्यानं आता दुसऱ्याला चालवायला दिलं आहे. यापूर्वीही बिष्णूनं अशा प्रकारचे कृत्य केल्याचं तपासात उघड झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mukesh ambani