मुंबई, 4 ऑगस्ट : मुंबई आणि परिसरात गेल्या काही तासांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे शनिवारी मुंबईत वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण 6 जणांचा मृत्यू झाला. अजूनही मुंबईतील काही भाग तसंच ठाणे आणि पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे.
मुंबई आणि परिसरात आजही पहाटेपासूनच पावसानं जोर धरला आहे. दिवसभर मुसळधार पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवारीदेखील (4 ऑगस्ट) जोरदार पाऊस सुरू होता. यामुळे सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू आहे.
समुद्रकिनारी आज दुपारी 2.29 वाजता मोठी भरती आहे. 4.83 मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळतील. नागरिकांनी समुद्राजवळ आणि साचलेल्या पाण्यात फिरू नये, असं महापालिकेनं आवाहन केलं आहे. पावसाचं पाणी साचल्यानं सायन आणि कुर्लादरम्यान चारही लाइनवरील सेवा सकाळी 7.20 पासून रद्द करण्यात आल्या होत्या. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेनं रविवारचा मेगा ब्लॉक रद्द केला आहे
दुसरीकडे, प्रवाशांचे हाल होत असल्याने कल्याण-ठाणे जलद आणि सीएसएमटी-चुनाभट्टी-वांद्र अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
VIDEO: राज्यात पावसाचा रेड अलर्ट, 'या' 6 जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा