मुंबई, 23 जून : "माझा नवरा 8 वर्षांपूर्वी नॅशनल पार्कमध्ये काम करत असताना दगावला. मात्र, तरीदेखील माझ्या मुलाला त्या जागेवर पर्मनंट नोकरी मिळत नाही. गेले 3-4 महिने झाले वेळेवर पगाराच मिळत नाही. अशीच परिस्थिती 4 वर्षांपासून सुरू आहे. सांगा आम्ही जगणार तरी कसं", नॅशनल पार्कमध्ये काम करणाऱ्या मंजू गौडा यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. (Workers agitation in Sanjay Gandhi National Park)
देशभरात प्रसिद्ध असलेल्या या पार्कमध्ये किमान 400 मजूर काम करतात. पुरुषांबरोबर अनेक महिलाही काम करतात. पण, प्रशासनाकडून त्यांच्या कष्टाची किंमत केली जात नाही. पगार वेळेवर मिळत नाही, व्याजाने कर्ज काढून कुटुंब चालवावं लागतंय, भीक मागण्याची वेळ आमच्यावर आलीय, अशीच प्रतिक्रिया प्रत्येक महिला मजुराची आहे. आपल्या मागण्यासाठी या मजुरांनी प्रशासनाविरोधात पार्कच्या गेटसमोर आंदोलन केलं. (Labor Movement)
"वेळेवर पगार मिळत नाही, उद्यान क्षेत्रात जे प्राणी मृत्युमुखी पडतात ते प्राणी अक्षरशः सडलेल्या अवस्थेत असतात ते उचलण्यासाठी मजुरांना सुरेक्षेचं साहित्य पुरवलं जात नाही, मजुरांना कोणताही युनिफॉर्म दिला जात नाही, गरजेच्या वेळी रजा मंजूर केली जात नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पगार वेळेवर होत नाही", असं या मजुरांचं म्हणणं आहे.
मजूर प्रमिला विणकर म्हणाल्या की, "माझा नवरा वारल्यानंतर माझ्या मुलाला त्या जागेवर नोकरी मिळणं गरजेचं होतं. पण त्याला पर्मनंट नोकरी मिळाली नाही. जिथे मिळाली आहे तिथे पगाराचे वांदे आहेत. आम्ही पिढ्यान पिढ्या इथं राहतो. मात्र, आता आम्हाला आता घर रिकामं करण्यास सांगितल आहे. आम्ही कुठे राहणार काय खणार? विभागानx आम्हाला घराच्या बाहेर काढणं चुकीचं आहे. का आम्हाला नॅशनल पार्कचं प्रशासन त्रास देतंय", असा प्रश्न प्रमिला विणकर यांनी उपस्थित केला आहे.
वाचा : मुंबईत खरा निसर्ग अनुभवायचंय? संजय गांधी नॅशनल पार्कचा हा SPECIAL REOPORT जरूर वाचा
अनेक मजुरांना अतिक्रमण म्हणून घर सोडण्यास सांगितलं आहे. आता त्या मजुरांवर घर सोडण्याची वेळ आली आहे. दररोजचे जेवणदेखील वेळेवर मिळत नसल्याने मजुरांवर भीक मागण्याची वेळ आली आहे. विमल महिरे म्हणाल्या की, "20 वर्षांपूर्वी माझा नवऱ्याचादेखील इथंच काम करताना मृत्यू झाला. पण, माझ्या मुलाला या लोकांनी नोकरी दिली नाही. आता पगारदेखील वेळेवर देत नाहीत. आमच्या घरांवर आता कारवाई करून घरातलं साहित्य रस्त्यावर फेकून दिलं आहे.
नॅशनल पार्कमधील कामगारांच्या मागणीसाठी आज नॅशनल पार्क येथे धडक कामगार युनियन मार्फत मोर्चा काढण्यात आला होता. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनसंरक्षक तसेच संचालक मल्लिकार्जुन जी यांनी मजुरांच्या प्रश्नांची माहिती करून घेतली. या आंदोलनात जवळपास 400 ते 500 मजूर सहभागी होते. मजुरांनी 17 मागण्या अधिकाऱ्यांसमोर ठेवल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Mumbai local