मुंबई, 17 जून : 'तुमच्या आमच्यामधील संवाद वाढवा आणि मराठी भाषेशी आपले नाते अधिक घट्ट व्हावे', यासाठीच मुंबई विद्यापीठ अमराठी भाषिकांसाठी 'मराठी प्रमाणपत्र कोर्स' (New course for non-Marathi speakers) सुरू करत आहे. मुंबईसारख्या शहरात भारतातील अनेक राज्यांतून लोक शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, वास्तव्यासाठी येत असतात. मात्र, मराठी भाषेच्या अपुऱ्या ज्ञानामुळे अनेकांना मुंबई शहरात त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी हा कोर्स करण्यात आला असल्याचे विद्यापीठाच्या (Mumbai University) प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अमराठी भाषिकांसाठी हा कोर्स 1986 पासूनच सुरू करण्यात आला होता. आता या कोर्समध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. मराठी शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. महाराष्ट्रात मराठी ही व्यवहार भाषा असल्याने मराठी येणे आवश्यक आहे. मात्र अनेक अभाषिक लोकांना मराठी येत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांचे निरसन होऊन इथल्या मातीशी, इथल्या भाषेशी आपले नाते अधिक घट्ट व्हावे त्यासाठीच मुंबई विद्यापीठाने हा कोर्स सुरू केला आहे.
वाचा : Aurangabad : फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करायचंय? MGM विद्यापीठातील कोर्स फक्त तुमच्यासाठीच : VIDEO
"मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाला नुकतीच 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मराठी विभागाने वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले होते. मुख्यतः आभ्यासक्रम केंद्री उपक्रम राबवून भाषा आणि साहित्य विषयक जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न विभागाने केला आहे. अमराठी भाषिकांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा त्याच्याच एक भाग आहे. हा अभ्यासक्रम विभागात 1986 पासून राबविला जातो. शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून विभागाने या अभ्यासक्रमात बदल केले आहेत. भाषिक कौशल्यांवर भर देऊन अभ्यासक्रमाची पुर्नरचना केली आहे", अशी माहिती मराठी विभागाच्या प्रमुख डॉ. वंदना महाजन यांनी सांगितले.
गुगल मॅपवरून साभार...
या कोर्ससाठी प्रवेश कसा घ्याल?
या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज करू शकता. शिवाय मुंबई विद्यापीठ, विद्या नगरी, कलिना, सांताक्रूझ पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400098 या पत्त्यावर जाऊन थेट संबंधित विभागात चौकशी करू शकता. 15 जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे, 15 जुलै ही तारीख प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. साधारणपणे 20 जुलैनंतर हा कोर्स सुरू होण्याची शक्यता आहे. तशी तारीख मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/department-of-marathi वेबसाईटवर कळवली जाईल. या कोर्सचा कालावधी 5 महिने आहे. तसेच या कोर्सची फी 1500 इतकी आहे.
कोर्स अंतर्गत कोणत्या सुविधा पुरवल्या जातात?
मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक सुविधा विद्यापीठ देणार असून यामधे अभ्यास साहित्य, ग्रंथ, नवीन शिक्षक आणि संदर्भ असणार आहेत. त्याच बरोबर मुख्य केंद्रावरून तसेच अन्य केंद्रामधून हा अभ्यासक्रम शिकवला जाईल. कोर्सचा प्रामुख्याने उद्देश अमराठी भाषीक विद्यार्थ्यांना मराठी शिकवणे हा असणार आहे. अनेक ठिकाणी मराठी आवश्यक असते म्हणून मराठी शिकवण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संवाद आणि व्यवहार करण्यासाठी या भाषेचा उपयोग होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Maharashtra News, Mumbai