मुंबई, 11 जून : देशातील तसेच राज्यातील अनेक भागातून पर्यटक (Tourist) मुंबईला भेट देत असतात. मुंबईत अनेक पर्यटन स्थळं आहेत. त्यातीलचं एक प्रसिद्ध असं संजय गांधी नॅशनल पार्क. शेकडो पर्यटक या पार्कला आवर्जून भेट देतात. विविध प्राणी, पक्षी, कीटक यांचा वावर आपल्याला पहायला मिळतो. मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडं निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षण घालवावेत, असं वाटलं की लोक संजय गांधी नॅशनल पार्कला भेट देतात. (Famous Sanjay Gandhi National Park in Mumbai)
कोरोना काळात संजय गांधी नॅशनल पार्क हे काही काळासाठी बंद होते. मात्र, संजय गांधी नॅशनल पार्क पर्यटकांसाठी खुले करण्यात आलेला आहे. देशातील तसेच राज्यातील विविध भागातून अनेक पर्यटक संजय गांधी पार्क मधील निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी येतात. महापालिकेच्या क्षेत्राच्या बाहेर हे पर्यटन स्थळ आहे. जवळजवळ 104 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये हे पसरलेले आहे. याला 'काळा पहाड' म्हणूनही संबोधले जाते.
या उद्यानात विविध प्रकारची सस्तन प्राणी, विविध प्रकारचे उभयचर प्राणी, विविध प्रकारचे प्राणी-पक्षी पहायला मिळतात. तसेच येथे बिबट्या हा प्रमुख प्राणी येथे आढळतो. मुंगूस, रानमांजर,अस्वल, हरीण इत्यादी प्राण्यांचादेखील वावर या अभयारण्यामध्ये होतो. या उद्यानामध्ये अनेक प्रकारचे वृक्ष आहेत. इतकंच नाही, तर या पार्कमध्ये अनेक बुद्धकालीन लेण्या (Kanheri Caves) पहायला मिळतात. कान्हेरी लेणी इथंच पहायला मिळते.
गुगल मॅपवरून साभार...
पर्यटक पार्कबद्दल आपला अनुभव सांगतात...
या संदर्भात पर्यटक आनंद शेठ म्हणाले की, "मी या पार्कबद्दल खूप ऐकून होतो. एकदा तरी या पार्कला भेट द्यावी, अशी इच्छा होती. आता ती पूर्ण झाली. मला नेहमी निसर्गाच्या सानिध्यात फिरायला आवडतं. या पार्कला भेट देऊन खूप छान वाटलं. इथून पुढे जेव्हा मुंबईला येईन तेव्हा या पार्कला जरूर भेट देईन." तर सईद शेख म्हणाले की, "मी नेहमीच नॅशनल पार्कला भेट देतो. बहुतांश स्थळे मी पाहिलेली आहेत. त्यामध्ये टायगर सफारी, कान्हेरी लेणी पुन्हा-पुन्हा पहायला आवडतं."
या नॅशनल पार्कसंबंधी उपयुक्त माहिती
सकाळी साधारणपणे 8 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत संजय गांधी नॅशनल पार्क पर्यटकांसाठी खुला असतो. प्रौढ व्यक्तींसाठी 77 रुपये तर लहान मुलांसाठी 41 रुपये प्रवेश फी आहे. तसेच सोमवारी बंद असते. बोरिवली स्टेशनपासून दीड किलोमीटर अंतर आहे. तर, CSMT स्टेशनपासून साधारण 40 किलोमीटरचे अंतर आहे, तिथे पोहोचायला साधारण 1 तास लागतो. पश्चिम दृतगती महामार्ग, बोरिवली ईस्ट, मुंबई, महाराष्ट्र 400066 या पत्ता आहे. संपर्क साधण्यासाठी 022 2886 0389 या क्रमांक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.